धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कसं मिळालं? धनुष्यबाण या चिन्हाचा इतिहास काय?
धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कसं मिळालं? धनुष्यबाण या चिन्हाचा इतिहास काय आहे. यामागची इटरेस्टींग स्टोरी.
सागर शिंदे, tv9 मुंबई : शिवसेना पक्ष कुणाचा? शिवसेनेचा नेता कोण?लयाचा निर्णय कोर्टात प्रलंबित आहे. पण, त्याआधीच निवडणूक आय़ोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल आहे. धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेना हा पक्ष गेली 33 वर्षे वापरत होता. पण चिन्हच गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतल्यानं उद्धव ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना पुढील निवडणूक धनुष्यबाण या चिन्हाविनाच लढावी लागणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कसं मिळालं? धनुष्यबाण या चिन्हाचा इतिहास काय आहे. यामागची इटरेस्टींग स्टोरी.
- शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली.
- 1967 साली शिवसेनेनं ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली
- 1968 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेचीही निवडणूक लढवली.
- त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं ढाल-तलवार.
- 1980 च्या दशकात शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं होतं.
- त्यावेळी मनोहर जोशी, सुभाष देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवली होती.ॉ
- 1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हं मिळाली होती.
- छगन भुजबळ यांनी त्यावेळी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
- शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह 1989 साली मिळालं.
1989 साली निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना चिन्हासाठी नोंदणी करण्याची सूचना केली होती. मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि विजय नाडकर्णी यांनी दिल्लीत जाऊन नोंदणीची प्रक्रिया पार पाडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलं.
1989 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले. निवडणूक आयोगाच्या निकषांपेक्षा शिवसेनेच्या मतांची टक्केवारी जास्त होती. त्यामुळं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेकडं कायम राहिलं.
1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता आलं. गेल्या 50 ते 60 वर्षांच्या राजकीय इतिहासात चिन्हावरुन वाद झाल्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाही. कित्येक पक्षात असे वाद झाले आहेत. हे वाद निवडणूक आयोगाच्या दारातही गेले आहेत.
बहुतांश केसमध्ये निवडणूक आयोगानं पक्षाचं मूळ चिन्ह गोठवलेलं आहे. या चिन्हावर दावा करणाऱ्या दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्हं दिल आहे.
70 च्या दशकात काँग्रेसमध्ये इंदिरा काँग्रेस आणि दुसरा सिंडिकेट काँग्रेस अशी फूट पडली होती. तेव्हा काँग्रेसचं मूळ चिन्ह नांगर जुंपलेली बैलजोडी होतं. त्यावेळी निवडणूक आयोगानं मूळ बैलजोडी चिन्ह गोठवून इंदिरा गांधींच्या काँग्रेसला गाय-वासरुचं चिन्हं दिलं होतं.
पुढे आणीबाणीमुळे पुन्हा काँग्रेस फुटली. गाय-वासरुच्या चिन्हावरुन वाद झाला. तेव्हा सुद्धा निवडणूक आयोगानं गाय-वासरु हे चिन्ह गोठवलं. आणि इंदिरा गांधींनी काँग्रेसचं आत्ताचं म्हणजेच हाताच्या पंज्याचं चिन्ह निवडलं
बिहारमध्येही रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीत पासवानांचा मुलगा आणि बंडखोर गट अशी फूट पडली होती. लोकजन शक्ती पार्टीचं मूळ चिन्ह झोपडी होतं, निवडणूक आयोगानं झोपडी चिन्हं गोठवलं आणि पासवानांच्या मुलाला हेलिकॉप्टर तर बंडखोर घटाला शिवणयंत्राचं चिन्हं दिलं.
शिवसेनेचं चिन्ह आता निवडणूक आयोगानं गोठवल आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना वेगवेगळं चिन्ह मिळणार आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबत 3 पर्याय देण्यात आले आहेत. त्रिशूळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय पाठवण्यात आला आहे.
शिवसेनेच्या चिन्हाबरोबर फक्त शिवसेना असं नावही दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिवसेना नावासोबत आणखी एक शब्द जोडावा लागणार आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यासाठी 3 नावं निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 3 नावं पाठवण्यात आली आहेत.
अंधेरी पोटनिवडणूक तोंडावर आहे. ही निवडणूक उद्धव ठाकरेंना धनुष्यबाणाव्यतिरिक्त वेगळ्याच चिन्हावर लढवावी लागणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढाव्या लागण्याची शक्यता आहे.
1989 ते 2022 पर्यंत धनुष्यबाण हीच शिवसेनेची ओळख होती. ,मात्र शिंदेंच्या बंडानंतर ती ओळख तात्पुरती का होईना पुसली गेली आहे. उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसैनिकांसाठी हा कसोटीचा काळ आहे.