Raj Thackeray : निकाल लागल्यावरच मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी हवं हे कसं आठवलं?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
शहा भाषणात सांगतात. फडणवीस मुख्यमंत्री होईल. तेव्हाच आक्षेप का घेतला नाही. त्यावेळीच त्यांना फोन का केला नाही. सर्व निकाल लागल्यावर तुम्हाला आठवलं. याचं कारण या सर्व गोष्टींची बोलणी आधीपासून सुरु असणार.
मुंबई : महाराष्ट्रात 2019 ला निवडणुका झाल्या. राज्यात भाजप-सेना एकत्र लढले. त्यानंतर शिवसेनेनं अडीच वर्षाच्या मुद्द्यावर फारकत घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, मला अजूनही आठवतं. मला माहीत आहे. मी त्या बैठकीला असायचो. सेंटर हॉटेल किंवा घरी बैठका व्हायच्या. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, प्रवीण महाजन यांच्यात एक गोष्ट ठरली. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे. 2019 ला तुम्ही मागणी करूच कशी शकता मुख्यमंत्री अडीच वर्षे आमचा म्हणून. तेही कमी आमदार आल्यावर, असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. ते म्हणाले, म्हणे कमिटमेंट केली. चार भिंतीत कमिटमेंट घेतली. माणसे दोनच. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री (Chief Minister) हे ठरलेलंच आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपद मागताच कसं. मागील दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीवर असलेले मनसे अध्यक्ष आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा (workers gathering) मुंबईत आयोजित केला. याप्रसंगी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना हा सवाल विचारला.
सर्व निकाल लागल्यावर तुम्हाला आठवलं का?
मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करायचे. त्या मंचावर उद्धव ठाकरे बसलेले. मोदी जाहीर भाषणात सांगतात. सत्ता येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. शहा भाषणात सांगतात. फडणवीस मुख्यमंत्री होईल. तेव्हाच आक्षेप का घेतला नाही. त्यावेळीच त्यांना फोन का केला नाही. सर्व निकाल लागल्यावर तुम्हाला आठवलं. याचं कारण या सर्व गोष्टींची बोलणी आधीपासून सुरु असणार.
तुम्ही मतांची किंमत केली नाही
लोकांनी मतदान कुणाला केलं होतं. दोन्हीकडच्या मतदारांना काय वाटलं असेल. तुम्ही त्यांच्यासोबत गेला. भाजप-सेनेच्या मतदारांना वाटत असेल दोन्ही काँग्रेस नको म्हणून तुम्हाला मतदान केलं. ते नकोत म्हणून मतदान केलं. तुम्ही त्यांच्यासोबत जाता. ही हिंमत होते कशी. जेव्हा लोकं शासन करत नाही. शिक्षा करत नाही. तेव्हाच ही हिंमत होते. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही आमच्या मतांची किमत केली नाही. तुम्ही प्रतारणा करता हे सांगत नाही. तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबी हेच राहणार आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.