नाना पटोले म्हणतात, काँग्रेसला नंबर 1चा पक्ष बनवणार पण कसे?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

| Updated on: Feb 09, 2021 | 2:24 PM

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला नंबर वनचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. (how nana patole will turn the Congress into the 'Number 1' party in the state?)

नाना पटोले म्हणतात, काँग्रेसला नंबर 1चा पक्ष बनवणार पण कसे?; वाचा स्पेशल रिपोर्ट!
नाना पटोले
Follow us on

मुंबई: काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला नंबर वनचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. विदर्भातील आक्रमक आणि अभ्यासू चेहरा असलेले नाना पटोले हे भाजपमधून खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद आणि आता थेट प्रदेशाध्यक्षपदी बढती दिली आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची काँग्रेसमधील बहुतेक पहिलीच वेळ असावी. त्यामुळे पटोले काँग्रेसला नंबरवन कसे करणार? काँग्रेस कार्यकर्ते त्यांना किती प्रतिसाद देणार? सध्याची काँग्रेसची राज्यातील अवस्था पाहता पक्षाला नंबरवन करण्याचं आव्हान पटोले खरेच पेलतील काय? याचा घेतलेला हा आढावा. (how nana patole will turn the Congress into the ‘Number 1’ party in the state?)

राज्यातील काँग्रेसचं पक्षीय बलाबल

राज्यात काँग्रेस सध्या नंबर चारचा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून भाजप हा नंबरवनचा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना नंबर दोनचा पक्ष आहे. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा नंबर लागतो. त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादीत अवघ्या काही जागांचा फरक आहे. राज्यात भाजपचे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 51, काँग्रेस 44, स्वाभिमानी शेतकरी, मार्क्सवादी पक्ष, मनसे आणि अपक्ष मिळून प्रत्येकी एक, सपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन आणि बविआचे तीन सदस्य महाराष्ट्र विधानसभेत आहेत. 78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित 60 पैकी 23 सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना 15, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 8, लोकभारती 1 असे 33 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेतही काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.

महापालिकेतही वर्चस्व नाही

राज्यात एकूण 27 महापालिका असून त्यापैकी परभणी, लातूर, भिवंडी-निजामपूर आणि कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व आहे. मुंबई महापालिका,ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महापालिका, औरंगाबद महापालिकेत काँग्रेस चौथ्या तर नाशिक, पुणे, नागपूर आणि सांगली मिरज आणि कुपवाडा महापालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धुळे पालिकेत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्हापरिषद, पंचायत समितीतही काँग्रेस तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर

राज्यातील 25 जिल्हा परिषदांपैकी भाजपकडे 10, राष्ट्रवादीकडे 6 , काँग्रेसकडे 5 आणि शिवसेनेकडे 4 जिल्हा परिषदा आहेत. जिल्हा परिषदेतही काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या 1600 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागांवर शिवसेना जिंकलेली आहे. उरलेल्या 13,833 जागांपैकी 13,769 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने 3,263, राष्ट्रवादीने 2,999, शिवसेनेने 2,808, काँग्रेसने 2,151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2,510 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचं दिसून आलं आहे.

पटोले आव्हान कसं पेलणार?

विधानसभेपासून ते पंचायत समितीपर्यंत काँग्रेसची राज्यात सर्वत्र पिछेहाट झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा राज्यात नंबर वन करणं नाना पटोले यांच्या समोर मोठं आव्हान राहणार आहे. त्यासाठी पटोले यांना काही धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत. पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम पटोलेंना करावं लागणार आहे. पक्षात तरुणांना संधी देण्याबरोबरच महिलांचाही सहभाग वाढवावा लागणार आहे. शिवाय काँग्रेसच्या मंत्र्यांना कामाला लावून त्यांच्या खात्याच्या योजना गरीबांपर्यंत पोहोचवाव्या लागणार आहे. प्रसंगी आघाडी सरकारशी दोन हातही करावे लागणार आहे. आपण सत्तेत असलो तरी जनतेशी आपली पहिली बांधिलकी असल्याचंही त्यांना दाखवून द्यावं लागणार आहे. त्याशिवाय महामंडळांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावून पक्षाचं बळ वाढवण्यावरही जोर द्यावा लागणार आहे. त्याशिवाय पक्षातील गटबाजीचाही त्यांना बंदोबस्त करावा लागणार आहे. मोर्चे, आंदोलने, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, सोशल इंजीनियरिंग अशा विविध गोष्टींवर त्यांना भर द्यावा लागणार आहे. तरच काँग्रेसला नंबर वन करण्यात ते यशस्वी होऊ शकतात, असं राजकीय निरीक्षक सांगतात.

काँग्रेस नसलेल्या जिल्ह्यांवर भर

राज्यात ज्या जिल्ह्यात काँग्रेस नाही किंवा काँग्रेसचा प्रभाव कमी आहे, अशी ठिकाणी पक्ष वाढीवर काँग्रेसला भर द्यावा लागणार आहे. विदर्भात काँग्रेसची स्थिती बरी आहे. पण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पक्षाची स्थिती वाईट आहे. त्या ठिकाणी त्यांना पक्ष वाढवण्यावर जोर द्यावा लागणार आहे. त्याशिवाय इतर पक्षातील नेत्यांना पक्षात आणून त्यांचं पुनर्वसन करण्याचं शिवधनुष्यही त्यांना पार पाडावं लागणार आहे. (how nana patole will turn the Congress into the ‘Number 1’ party in the state?)

 

संबंधित बातम्या:

राम शिंदेंच्या प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील पितापुत्र भाजपला जड भरतायत?

Special Story: ओबीसींची जनगणना भारतीय राजकारणाची कूस बदलणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

Special Story: प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे?, अयोध्येचा ‘राज’मार्ग यशस्वी होणार?; वाचा विशेष रिपोर्ट

(how nana patole will turn the Congress into the ‘Number 1’ party in the state?)