दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, विनोद तावडे यांनी 4 वर्षात असं केलं कमबॅक
राज्याच्या राजकारणातील एक मोठं नाव २०१९ मध्ये जेव्हा बाजुला झालं तेव्हा कुणाला वाटलं देखील नव्हतंं की, हेच नाव नंतर देशाच्या राजकारणात आपला दबदबा वाढवेल. विनोद तावडे यांनी जेव्हा भाजपची पहिली यादी जाहीर केली तेव्हात त्यांचा दबदबा किती वाढलाय याची कल्पना अनेकांना आली असेल.
Vinod Tawade : राज्याच्या राजकारणात ज्यांना तिकीट नाकारलं गेले ते भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी गेल्या चार वर्षांत राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा तयार केलाय. एकेकाळी ज्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या गाडीत बसू दिलं गेलं नव्हतं. तेच विनोद तावडे आज राजनाथ सिंग यांच्यासोबत विमानाने विविध राज्यात महामंत्री म्हणून जात आहेत. २०१९ नंतर विनोद तावडे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला असं म्हणणाऱ्यांना विनोद तावडे यांनी गेल्या चार वर्षात उत्तर दिले आहे.
विनोद तावडे यांनी मोठी जबाबदारी
भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहेत. तर एनडीला अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. हा ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी भाजपने विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. विनोद तावडे यांनी बिहारच्या राजकारणात देखील भूकंप घडवून आणला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा एनडीएमध्ये आणण्यात भाजपला यश आले आहे. या कामात महत्त्वाच्या भूमिकेत होते ते विनोद तावडे. विनोद तावडे यांना भाजपने बिहारचे प्रभारी म्हणून पाठवले होते. त्यानंतर एकूण सहा पक्षांना एकत्र करत त्यांनी एनडीएची मुठ बांधली आहे. बिहारमध्ये जागावाटप ही निश्चित झाले आहे.
पक्षाची ताकद वाढवण्याचं काम
हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, बिहार नंतर आता झारखंडमध्ये ही विनोद तावडे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची देशाच्या राजकारणात वाढत असलेले महत्त्व पाहता मुख्यमंत्रीपदापर्यंत ते पोहोचतील अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. कारण मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवल्यानंतर भाजपने प्रस्थापित चेहऱ्यांना बाजूला सारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मोदी-शहा यांच्या विश्वासातले नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंग यांच्यानंतर आता विनोद तावडे यांना भाजपात प्रमुख स्थान आहे. तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. इतकंच नाही तर ते आता मोदी आणि शाह यांच्या विश्वासातले झाले आहेत. जी गोष्ट अनेकांना जमली नाही ती गोष्ट विनोद तावडे यांनी करुन दाखवली आहे.