CM Uddhav Thackeray Live Speech: हिंदुत्व, मुख्यमंत्रीपदाचा त्याग ते शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्याची तयारी; उद्धव ठाकरे यांचं भाषण जशास तसे
CM Uddhav Thackeray Live Speech: तुम्ही मला सांगा, मी मुख्यमंत्रीपद सोडलंच म्हणून समजा. मी माझं मन घट्ट करून बसलो आहे. मुख्यमंत्रीपदी राहायची माझी अजिबात इच्छा नाही. हे प्रेम असंच ठेवा. एवढं बोलतो.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत (shivsena) एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे केवळ महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं नाही. तर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी थेट सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. पण ही चर्चा निष्फळ ठरली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काल आणि आज दिवसभर आघाडीच्या नेत्यांच्या जोर बैठका झाल्यानंतर अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरून बोलणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष त्याकडे लागलं. तब्बल 48 तासानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी हिंदुत्व, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारीपासून ते विरोधकांचे कारनामे यावर त्यांनी भाष्य केलं.
उद्धव ठाकरे यांचं भाषण जशास तसं
माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
नमस्कार, जय महाराष्ट्र.
बऱ्याच दिवसानंतर किंवा महिन्यानंतर आपण भेटत आहोत. पहिल्यांदाच एक खुलासा करतो. आजच्या माझ्या या फेसबुक लाईव्हनंतर काही लोक टीका करतील किंवा टिप्पणी करतील की, मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडला होता. त्यांचा आवाज असा भारदस्त किंवा नाकातून येत होता. तर सहाजिकच आहे. कारण आजच सकाळी माझी कोविड टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे हा इतर कशाचा दुष्परिणाम नाही तर तो कोविडचा जो काही दुष्परिणाम असतो तो आहे. असो.
बऱ्याच महिन्यांनंतर मी आपल्यासमोर आल्यावर बोलणार काय आहे? बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. थोड्याफार बोलणार आहे. हेही माहीत आहे. कोविड काळात जी लढाई आपण लढलो. प्रसंग बाका होता. मला कसलाच अनुभव नव्हता. कोणीही कोविडला तोंड देऊ शकलं नव्हतं. कुणाच्याही वाट्याला हा अनुभव आला नव्हता. अशा काळात प्रशासन माहीत नसलेल्या माणसाच्या वाटेला दोन तीन महिन्यातच कोविड आला. मला जे काही करायचं होतं तेही मी त्यावेळी प्रामाणिकपणे केलं. कोविडपासून सावध कसं राहायचं. सावध कसं राहायंचं हे सांगितलं. हे मी तुम्हाला का सांगतोय. तर त्यावेळी जे जे सर्व्हे झाले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं.
शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? मुख्यमंत्री भेटत का नव्हते? मुख्यमंत्री भेटत नव्हते. काही दिवसांपूर्वी हे सत्य होतं. माध्यमात अनेक अफवा. मी भेटूत नव्हतो हे काही दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया झाली होती. त्याचा अनुभव सांगणार नाही. पण दोन ते तीन महिने मी भेटू शकत नव्हतो. हा मुद्दा बरोबर आहे. त्यानंतर मी भेटायला सुरुवात केली आहे. पहिली कॅबिनेट रूग्णालयातून केली. मी भेटत नव्हतो, पण कामं थांबली नव्हती.
शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे. कोणी शिवसेना आणि हिंदुत्वाला एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य, एकनाथ शिंदे, काही आमदार, खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुखय्मंत्री असेल. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही? बाळासाहेब गेल्यानंतर 2014ची एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसेच होतो. तेव्हा 63 आमदार आले. तेव्हाही आपले मंत्री होते. आताच्या मंत्रिमंडळातही तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा.
शिवसेनेचे आमदार गायब झाले, सुरतला गेले, गुवाहाटीाला गेले अशी चर्चा होती. त्यात मला पडायचं नाही. परवा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार हॉटेलात होते. मी म्हटलं ही कोणती लोकशाही आहे? आपल्या माणसांना एकत्रं ठेवावं लागतं. अरे हा कोठे गेला? तो कुठे गेला? त्यावर शंका घेतली जात होती. एखादा आमदार लघवीला गेला तरी शंका घेतल्या जात होती. म्हणजे लघुशंका.
आता मी मुख्यमंत्री कसा झालो? मला काहीच अनुभव नव्हता. पण जे काही घडलं. मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रणांगणात उतरलो. आपल्याला नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. तीन पक्षाची बैठक झाली. त्यात ठरलं. त्यानंतर शरद पवारांनी मला बाजूच्या कॅबिनमध्ये बोलावलं. ते म्हणाले, हे ठरलं. पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. मी म्हटलं, पवार साहेब मस्करी करता का? मी कधी साधा महापौर झालो नाही. मी महापालिकेत फक्त महापौरांना शुभेच्छा द्यायला गेलोय. साधा नगरसेवकपदाचा अनुभव नसतानाही मी कसा मुख्यमत्री होणार? असा सवाल मी पवारांना केला. त्यावर पवार म्हणाले, तुम्हीच जबाबदारी घ्या. त्यावर मी म्हणालो, ठिक आहे. घेतो जबाबदारी. माझ्यावर पवारांनी विश्वास टाकला. सोनिया गांधींनी विश्वास टाकला. सोनिया गांधी मधून मधून फोन करून विचारपूस करत असतात. या सर्वांनी सहाकर्य केलं. प्रशासनानेही सहकार्य केलं. काही चूक असेल तर प्रशासानाने लक्षात आणून दिलं.
आज मी नेमकं काय बोलणार? मला दु:ख कशाचं झालं? आश्चर्य कशाचं वाटलं? दु:खं कशाचं वाटलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर म्हणाली असती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजू शकलो असतो. कारण ते दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. त्यांची विचारधारा आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यांनी भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत असतील मी मुख्यमंत्री नको. (ते मला माझं मानतात की नाही माहीत नाही) तुम्ही इथं येऊन का बोलला नाही? माझ्यासमोर बोलायला हवं होतं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहात हे सांगायला हवं होतं. तुम्ही नकोत असं बोलायला हवं होतं. मला जर एकाही आमदाराने सांगितलं की, तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. मी वर्षा निवासस्थानीही राहणार नाही. आजच मी मातोश्रीवरून मुक्काम हलवणार नाही. मला सत्तेचा मोह नाही. कशाचाही मोह नाही. पण तुम्ही हे कशाला करत आहात? त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे?
माझ्यासमोर येऊन बोला. शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, ही शिवसेना आमची आहे, ती नाही. कशाला बोलत आहात बाहेर? कशाला करत आहात असं? त्यामुळे नुकसान कुणाचं होत आहे? एक गोष्ट आहे. ती म्हणजे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. हीच ती गोष्ट आहे. त्याचा अर्थ अनेकांना माहीत नाही. एकदा एका जंगलात एक लाकूडतोड्या झाड तोडत होता. झाडावर घाव घालत होता. त्यावर राहणारे सर्व पक्षी कासावीस झाले. आपला आसरा जाणार. छप्पर हरवाणार असं त्यांना वाटत होतं. घाव घालत असताना झाडाला वेदना होत होत्या. त्यामुळे पक्षी झाडाशी बोलू लागले. दादा, तुला खूप दुखत असेल ना रे. तुझ्यावर कुऱ्हाडीचे घाव पडत आहेत ना, असं पक्षांनी झाडाला विचारलं. त्यावर झाड म्हणाले, मला दु:ख होतंय. वेदना होतात. पण कुऱ्हाडीच्या घावाच्या नाही. तर ज्या कुऱ्हाडीने घाव घातला जातोय त्याचं लाकूड माझ्या फांदीचं आहे. त्याच्या मला वेदना होत आहेत. हेच आज चाललं आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा गोतास काळ म्हणजे आपली राजकारणातील जन्मदात्री आहे, तिचचं लाकूड वापरून घाव घालू नका. या समोर बसा. मी देतो राजीनामा. तुमच्या हातात राजीनामा देतो. आज तयार करतो. तुम्ही या आणि माझं राजीनामा पत्रं राज्यपालांना द्या. मी नाही जाणार राजीनामा घेऊन. हवं तर तुम्हीच घेऊन जा. कारण मला कोविड झाला आहे. जर राज्यपाल म्हणाले, उद्धव ठाकरेंना येऊ द्या. तर मग मी यायला तयार आहे.
हा कुठेही अगतिकपणा नाही. लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी तर अजिबात नाही. आजपर्यंत असे अनेक आव्हाने आपण बिनसत्तेचे पेलले आहेत. हे काय मोठं आव्हान आहे? काय होईल जास्तीत जास्त. परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी भीत नाही. मी आव्हानाला सामोरे जाणारा माणूस आहे. त्यामुळे मी घाबरून पाठ दाखवणारा नाही.
शिवसैनिकांना आवाहन करतोय. ही बाळसााहेबांची शिवसेना राहिली नाही असा आरोप केला जात आहे. त्याला माझ्याकडे उत्तर आहे. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल मी शिवसेनेचं नेतृत्व तयार करायला नालायक आहे, तर मी ते पदही सोडायला तयार आहे. शिवसेनाप्रमुखपदही सोडायला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नको. असे फडतूस लोकं खूप आहेत. त्यांच्या सांगण्यावरून ट्विटर, ट्रोलिंगवरून सांगणारे खूप आहेत. मी त्यांना बांधील नाही. मी माझ्या शिवसैनिकांना बांधील आहे. संकटाला सामोरे जाणारा माझा शिवसैनिक आहे. त्याने सांगावं, मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे. पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे. त्याही पलिकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी चालेल तर तेही मला मान्य आहे. मला समोर येऊन सांगा. मी खूर्ची अडवून ठेवलीय ना. तुम्ही या समोरून, सांगा. फोनवरून सांगा. आम्हाला संकोच वाटतोय. पण तुम्ही म्हणाला तसे आम्हाला तुम्ही नको, असं सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीद सोडायला तयार आहे.
बांधवांनो पदे येतात आणि जात असतात. आयुष्याची कमाई काय? तुम्ही जे काही काम करता. त्यातून जनतेची जी प्रतिक्रिया असते ती खरी कमाई असते. या अडीच वर्षात जे तुम्ही मला प्रेम दिलं. कुठे झाली हो आपली भेट. याच माध्यमातून आपण बोलत आलो. अनेकांनी सांगितलं. उद्धवजी, तुम्ही बोलता तेव्हा कुटुंबातील माणूस बोलतोय असं वाटतं. हे भाग्य मला नाही वाटत परत मिळेल. ज्यांची ओळखपाळख नाही, दूर कुठे तरी राहतात. मुंबईत राहिले तरी भेटीचा योग नसतो. तेव्हा याच माध्यमातून बोलल्यावर तुम्ही स्तुती करता ही आयुष्याची कमाई आहे. मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे आलं. आता मी या पदाला चिपकून बसत नाही. तुम्ही सांगा मी पायउतार होतो. तुम्ही म्हणाल हे नाटक आहे. हे अजितबात नाटक नाही. संख्या किती कुणाकडे आहे. गौण विषय आहे. शेवटी ही लोकशाही आहे. ज्याच्याकडे संख्या अधिक तो जिंकतो. ती संख्या तुम्ही कशी जमवता. प्रेमाने जमवता, जोरजबरदस्तीने की दटावण्या देऊन जमवता हे नगण्य असतं. समोर उभं केल्यावर डोकी मोजली जातात आणि अविश्वास ठराव मंजूर किंवा नामंजूर होतात. मी ज्यांना मानतो किंवा मला जे मानतात त्यापैकी किती जण तिकडे गेले? किती जण माझ्याविरोधात मतदान करतील, नाही… एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तरी ती माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणून मला एकही मताने माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही मला सांगा, मी मुख्यमंत्रीपद सोडलंच म्हणून समजा. मी माझं मन घट्ट करून बसलो आहे. मुख्यमंत्रीपदी राहायची माझी अजिबात इच्छा नाही. हे प्रेम असंच ठेवा. एवढं बोलतो.
जय महाराष्ट्र