मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची ईडीने (ED) कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मलाही गुवाहाटीला येण्याची ऑफर होती. पण मी गेलो नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक (shivsena) आहे, असं संजय राऊत म्हणाले. जेव्हा कारण नसताना चौकश्या होतात. तेव्हा आपण या चौकशांना सामोरे गेलं पाहिजे. अशावेळी तू काही केलं नाही, असं आपला अंतरात्मा सांगत असतो. निर्भिडपणे चौकशीला सामोरे जा, असंही अंतरात्मा सांगत असतो. त्याच आत्मविश्वासाने चौकशीला सामोरे गेलो. दहा तासाने बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. ऑफरही होते. मलाही बोलावण्याचे प्रयत्न झाले ना. पण आम्ही नाही गेलो. आम्ही ठाकरे शिवसेना यांच्यासोबत राहिलो, असं संजय राऊत म्हणाले.
स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये पर वचन न जाये, हे बाळासाहेबांनी शिकवलं आहे. मी याबाबतीत बेडर आहे. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचे कारण नाही. हे मी इतरांना सांगत असतो, असं सांगतानाच शिवसेनेत डरना मना है, असं राऊत म्हणाले.
तुम्हीच ईडीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याची चर्चा आहे, असा सवाल त्यांना केला. त्यावर राऊत हसले. मी ईडीला प्रश्न केले नाही. त्यांचेही प्रश्न असतात. त्यांचा रिस्पेक्ट असतो. सरकारी कागद आहेत. त्यांनी काही प्रश्न केले. त्याला मी उत्तरे दिली, असं ते म्हणाले. काल अधिकाऱ्यांना सांगितलं मी बॅग भरून आलो आहे. मी घाबरणार नाही. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा. अडचण नाही. तुम्ही तुमची ड्युटी करा. मी माझं कर्तव्य पार पाडतो. अशा पद्धतीने कालचा दिवस गेला, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोले लगावले. फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत होते. पक्षाच्या बैठकीत त्यांचं नाव जवळपास निश्चित झालं होते. पण त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असं सांगितलं गेलं. शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. फडणवीसांच्या काळात शिंदे ज्युनिअर मंत्री होते. आता फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणार आहेत. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यासाठी, असा टोलाही त्यांनी काढला.