Eknath Shinde: वाढता वाढता वाढे, शिंदे गटाच्या आमदारांचा आकडा 45 कडे, उद्धव ठाकरे शिवसेनेची ओहोटी कशी थांबवणार?

| Updated on: Jun 22, 2022 | 11:28 AM

Eknath Shinde: आपल्यासोबत किती आमदार आहेत. हे शिंदे यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी कोणताही दावा केला नव्हता. मात्र, शिंदे यांच्यासोबत 13 आमदार असल्याचा मीडियाचा अंदाज होता. त्यानंतर काल रात्री उशिरा शिंदे समर्थक आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं.

Eknath Shinde: वाढता वाढता वाढे, शिंदे गटाच्या आमदारांचा आकडा 45 कडे, उद्धव ठाकरे शिवसेनेची ओहोटी कशी थांबवणार?
वाढता वाढता वाढे, शिंदे गटाच्या आमदारांचा आकडा 45 कडे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत 13 आमदार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर शिंदे यांच्याकडे 22 आमदार असल्याची बातमी आली. त्यानंतर शिंदे यांच्याकडे 35 आमदार असल्याची बातमी आली. आजची सकाळ उजाडता उजाडता शिंदे यांच्याकडे 40 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना आपल्याकडे 40 हून अधिक आमदार (MLA) असल्याचा दावा केला होता. मात्र, आता हाती आलेल्या माहितीनुसार शिंदे यांच्याकडे 45 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्याकडे दोन तृतियांश आमदारांपेक्षा अधिक आमदारांचं बळ असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे शिंदे आपला नवीन गट स्थापन करतील आणि भाजपशी (bjp) हातमिळवणी करून राज्यात नवं सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

विधान परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन आधी सुरतला गेले. तिथे त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर गेले होते. नार्वेकरांनी शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंचा निरोपही त्यांना दिला. मात्र, शिंदे यांनी तुमचं तुम्ही पाहा आणि माझं मी पाहतो, असं उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे परत येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा

आकडा कसा कळला?

आपल्यासोबत किती आमदार आहेत. हे शिंदे यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी कोणताही दावा केला नव्हता. मात्र, शिंदे यांच्यासोबत 13 आमदार असल्याचा मीडियाचा अंदाज होता. त्यानंतर काल रात्री उशिरा शिंदे समर्थक आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं. सुरत येथील ला मेरेडियन हॉटेलमधून या आमदारांना विमानतळावर नेण्यात आलं. त्यासाठी बस आणली होती. त्यावेळी आमदार रांगेत उभे राहून बसमध्ये चढले. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शिंदे यांच्यासोबत 45 आमदार असल्याचं कन्फर्म झालं. शिंदे यांनीही नंतर मीडियाशी संवाद साधातना आपल्याकडे 40 आमदार असल्याचं सांगितंल होतं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही फूट रोखण्याचं शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

गटनेतेपदासाठी प्रयत्न

शिवसेनेने काल एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या ऐवजी अजय चौधरींकडे गटनेतेपद दिलं. त्यामुळे शिंदे दुखावले आहेत. मी कोणतीही पक्षविरोधी कारवाई केलेली नसताना मला पदावरून का हटवण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे विचारणाही केली होती. दरम्यान, शिवसेनेकडे संख्याबळ नाही. त्यामुळे गटनेतेपदावरून ते मला हटवू शकत नाही. माझ्याकडे आकडा आहे. त्यामुळे मीच गटनेता आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच गटनेतेपदासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.