Video : गिरीश महाजन चावट, त्यांची क्लिप मिळाली; नाथाभाऊ खडसे यांचं वादग्रस्त विधान
जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाज बांधव हे दोन किलो मटण आणि एका दारूच्या बाटलीवर मतदान करतात, असं वक्तव्य केल होतं.
जळगाव: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते भाजपचे नेते आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांना चावट म्हणताना दिसत आहे. त्यामुळे खडसे यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत असल्याने खडसे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, टीव्ही9 मराठी या व्हिडीओच्या सत्यतेबद्दल कोणतीही पुष्टी करत नाहीये.
जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांचा सोशल मीडियावर गिरीश महाजन यांना चावट म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बघा गिरीश महाजन चावट आहे. त्यांच्या एका वक्तव्याची क्लिप मला मिळाली आहे, असं म्हणताना एकनाथ खडसे या व्हिडीओत दिसतात. काही लोकांशी चर्चा करताना त्यांनी हे विधान केल्याचं दिसत आहे.
गिरीश महाजन यांनी बंजारा समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांच्या जयंती प्रसंगी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा करताना खडसे या व्हिडीओत दिसत आहेत.
दरम्यान, खडसे यांनी बंजारा समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव बंजारा समाजाने आक्रोश मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाज बांधव हे दोन किलो मटण आणि एका दारूच्या बाटलीवर मतदान करतात, असं वक्तव्य केल होतं.
त्यामुळे खडसे यांचा राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत असून ठिकठिकाणी निवेदन देण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
आज या मोर्चापूर्वीच बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला चपला तसेच जोडे मारून संताप व्यक्त केला. तसेच एकनाथ खडसेंची प्रतिमा असलेल्या फलकाला लाथा मारून संतप्त भावना व्यक्त केल्या.
खडसेंनी बंजारा समाजाबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत निषेधार्य आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तर त्यांनी राजीनामा दिला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.