मुंबई: उपमुख्यमंत्रीपद केवळ मला मिळू नये म्हणून शिवसेनेने ते नाकारले होते. अजित पवार (ajit pawar) यांचा विरोध असल्याचं दाखवून शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारलं होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केला. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला. शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तब्बल 14 दिवसानंतर मौन सोडलं. यावेळी त्यांनी शिवसेनेतील (shivsena) संघर्षातील कहानी ऐकवतानाच बंडामागची कारणमीमांसाही सांगितली. यावेळी शिवसेनेचा बुरखाही टराटरा फाडला. आपल्या नगरविकास खात्यात अजित पवार यांची ढवळाढवळ कशी सुरू होती आणि शिवसेनेच्या नेत्यांची कशी ढवळाढवळ सुरू होती, याची माहिती देत जोरदार टोलेबाजी केली. माझ्या खात्यात कोणीही ढवळाढवळ करत असतानाही मी काहीच बोलत नव्हतो, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात फुल बॅटिंग केली. मला उपमुख्यमंत्री करणार होते. ही वस्तुस्थिती होती. पण अजितदादांनी सांगितलं शिंदे नको म्हणून. मी कोणत्याही पदाची लालसा केली नाही. करणार नाही. अजितदादा एकदा सुधीर जोशी, मनोहर जोशी यांचा किस्सा सांगत होते. त्यावेळी ते म्हणाले, अहो, तो अपघात होता. त्यांना मी बाजूला घेऊन विचारलं. तेव्हा ते म्हणाले. आम्ही तुमच्या नावाला कधी विरोध केला नाही. तो तुमच्या पक्षाचा निर्णय होता. फडणवीस शिवसेना उपमुख्यमंत्रीपद देणार होते. गडकरी साहेब भिवंडीत आले होते. फडणवीस म्हणाले, संधी चांगली मिळेल. मी काही रिअॅक्शन दिली नाही. ते पद आम्ही घेणारच नाही. कारण ते मला द्यावं लागेल म्हणून. मी रिअॅक्ट झालो नाही. मी गप्प झालो, असं शिंदे म्हणाले.
तुम्ही म्हणाला एमएसआरडीचं खातं दिलं. चांगलं खातं द्यायचं होतं. पण ते खातं देण्याचं काम यांचं नव्हतं. समृद्धीचं काम फडणवीसांनी दिलं. तेव्हा माझे पुतळे जाळले गेले. एकदा तर विमान क्रॅश होता होता वाचलं. मोपलवार तर देवाचा धावा करत होता. विमानात बसलो पायलट सरदारजी होता. विमान खाली वर होत होतं. त्याने थंब केला होता. त्याला म्हटलं आता काय ढगात गेल्यावर करतो. तो म्हणाला, आधीच विमान अहमदाबादला लँड झालं. त्यामुळे ढगात घुसलो, असं शिंदे यांनी सांगताच सभागृहात एकच खसखस पिकली.
ठाणे महापालिका सभागृह नेता झाल्यावर मी मागे वळून पाहिलं नाही. माझं सभागृह नेत्याचं दालन रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असायचं. मी खूप मेहनत केली. त्यावेळी लेडीज बारचा सुळसुळाट होता. तेव्हा पैशाची उधळण सुरू होती. मी पोलिसांना अनेकदा पत्रं दिली. आयाबहिणी सांगायच्या संसार उद्ध्वस्त होतोय. १६ लेडीजबार मी तोडले. माझ्या विरोधात पिटीशन टाकली. त्यावेळी गँगवार होत होता. मला ठार मारण्याचा प्लॅन होता. तेव्हा आनंद दिघेंना सांगितलं. तेव्हा त्यांनी शेट्टी लोकांना बोलावलं आणि सांगितलं एकनाथ को कुछ हो गया तो समज जाव. त्यानंतर मी वाचलो, असं त्यांनी सांगितलं.
आनंद दिघेंचा मृत्यू झाला. तेव्हा मी कोलमडून गेलो. तेव्हा लोकांचा उद्रेक झाला. हॉस्पिटल तोडलं. लोक बेभान झाले होते. मी तिथे नसतो तर सिलेंडर स्फोट होऊन शंभर एक लोक मेले असते. त्यावेळी शंभर लोकांना अटक झाली. तेव्हा पोलिसांना सांगितलं हा उद्रेक आहे. जाणूनबुजून केलेली कृती नाही. ठाण्यातून शिवसेना संपली असं वाटत होतं. बाळासाहेबांनाही तसं वाटत होतं. दिघेंच्या आशीर्वादाने आम्ही ठाणे पालघर जिल्हा राखला, असंही ते म्हणाले.