PM Modi TV9 Interview : ‘उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी वहिनींना रोज फोन करायचो’, नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे.
शिवसेना आणि भाजपची महायुती 2019 मध्ये तुटली. दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक बनले. पण तरीही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे भाजप नेत्यांसोबत चांगले संबंध होते. हे संबंध आजही चांगले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी पुकारलेल्या बंडामुळे तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. शिंदेंना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा चांगला पाठिंबा होता. त्यामुळे 40 आमदारांसह शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला. परिणामी उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन केलं. तसेच आपण शिवसेना सोडली नाही म्हणून एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाची अधिकृत सूत्रे आपल्या हातात घेतली. शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हही बहाल झालं. या घडामोडींनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या मैत्रीपूर्व संबंधांवर भाष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मोदींनी आपण उद्धव ठाकरे आजारी असताना रोज फोन करत होतो, असं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आजारी पडले होते. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मोदींनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना आपण त्यांना रोज फोन करायचो, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.
नरेंद्र मोदी ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेन”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी दिली.