Rajan Salvi : भाजपत कधी प्रवेश करणार? अखेर राजन साळवींनी समोर येऊन दिली उत्तर
Rajan Salvi : माजी आमदार राजन साळवी हे लवकरच उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर अखेर राजन साळवी यांनी मौन सोडलं आहे. मीडियासमोर येऊन त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तर दिलीत. आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील मोठे नेते मानले जातात. आज स्वत: राजन साळवी यांनी माध्यमांसमोर येऊन या बद्दल माहिती दिली आहे. “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे. पराभव झाल्याची मोठी खंत, वेदना मला व मतदारसंघातील माझ्या जनतेला आहेत” असं राजन साळवी म्हणाले. “मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले.
“पराभवाची खंत आहे. पणी मी नाराज नाही. भाजपत प्रवेश करणार या अफवा आहेत” असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं. भाजपकडून ऑफर आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणारच. तसा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असू शकतो. ते भाजप नेत्यांच मत आहे”
निवडून आलेले आमदार शिंदे गटात जाणार का?
शिवसेना शिंदे गटाचे आबिटकर म्हणाले, की राजन साळवी येणार असतील, तर स्वागत आहे. यावर साळवी म्हणाले की, “पक्षात येणाऱ्या प्रत्येक माणसाच स्वागत करण्याची भावना असते. मी मतदारसंघात संघटन कौशल्याने काम केलय. त्या भावनेने ते बोलत असतील” उद्धव ठाकरे गटातील निवडून आलेले आमदार, माजी आमदार शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं नरेश म्हस्के म्हणाले. या प्रश्नाव राजन साळवी म्हणाले की, “ते त्यांचं व्यक्तीगत मत असेल. मी माझ्या भावना सांगितल्या आहेत. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मी माझ्या मतदारसंघात रोजच्या पद्धतीने काम करत आहे”
टांगती तलवार कायम
निवडणूक झाल्यावर पक्षातील वरिष्ठांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला का? त्यावर राजन साळवी म्हणाले की, “पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यात पराभवाची कारण काय? यावर आत्मचिंतन झालं. योग्य सूचना देण्यात आल्या” भाजपमधून आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही, हे राजन साळवी यांनी स्पष्ट केलं. एसीबीकडून सुरु असलेल्या चौकशीवर म्हणाले की, “अँटी करप्शन ब्युरोकडून माझी आणि माझ्या कुटुंबाची चौकशी सुरु आहे. आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुट्टीनंतर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचा काय प्रयत्न असेल माहित नाही, पण टांगती तलवार कायम आहे”