Video : अजित पवार यांचं बंड, राष्ट्रवादीची अपात्रतेची याचिका; विधानसभा अध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया काय?
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. त्यांच्यासह नऊ जणांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केलं आहे. त्यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केलं आहे. अजित पवार हे राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत इतर आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अॅक्शन मोडमध्ये आला आहे. राष्ट्रवादीने थेट या मंत्र्याना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे धाव घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याकडे राष्ट्रवादीची याचिका आल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांच्या विरोधात केलेली अपात्रतेची याचिका मला मिळाली आहे. त्या याचिकेत काय म्हटलं ती वाचल्यानंतर मी त्यावर निर्णय घेणार. या याचिकेतील मुद्द्यांचा मी अभ्यास करणार आहे. त्यानंतरच मी त्यावर भाष्य करेल. याचिका न वाचताच मी त्यावर निर्णय कसा देणार, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार माझा
अजित पवार यांना किती आमदारांचं समर्थन आहे हे मला माहीत नाही. त्याची यादी माझ्याकडे आली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर मी काहीच सांगू शकत नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले. सभागृहात विरोधी पक्षनेत्याची निवड विधानसभा अध्यक्ष करतात. विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार हा अध्यक्षांचाच असतो. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसार आणि संवैधानिक तरतुदीनुसार पुढील निर्णय घेणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यपालांसमोर परेड व्हावी
दरम्यान, या मुद्द्यावर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले हे पाहावे लागेल. अजित पवार यांनी राज्यपालांना किती आमदारांच्या सह्याचं पत्र दिलं हे पाहावं लागेल. राज्यपालांना नुसतं पत्र देऊन चालत नाही. तर आमदारांची परेड राज्यपालांसमोर झाली पाहिजे. तेव्हाच या आमदारांचा पाठिंबा गृहीत धरला जातो. 9 मंत्र्यांवर कारवाई केली जाईल. ते अपात्र ठरू शकतात, असं असमी सरोदे यांनी सांगितलं.
राजकारण रेटून नेतील
नऊ आमदारांवर कारवाई होऊ शकते. पण आता राजकारण रेटून नेतील. याआधी शिंदेच्या प्रकरणात न्यायालयाने न्यायिक चुका केल्या आहेत. त्यामुळे आता पात्र, अपात्र कारवाईला आमदार आता घाबरत नाहीत. अजित पवार यांनी केलेला बंड म्हणजे घातक पायंडा आहे. त्यामुळेच जयंत पाटील यांनी दिलेली नोटीस योग्यच आहे. अध्यक्ष कारणे दाखवा नोटीस देऊन त्या मंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागतील. त्यांना हे सगळ लेखी सादर करावे लागतील. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली जाईल. दोन्ही वेळेस स्वार्थी राजकारणासाठी फूट पाडली गेली. ईडीग्रस्त लोकं हे शिंदे आणि पवार गटात गेले आहेत. जे आधी झालं तेच आता देखील झालं हेच साम्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.