Explain | शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास महाराष्ट्रातील राजकारण कसं बदलेल? कोणाचा फायदा-तोटा?
महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा एक निर्णय नजीक भविष्यात होऊ शकतो. विद्यमान राजकीय परिस्थितीत शरद पवार असा निर्णय घेऊ शकतात. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात काकापेक्षा पुतण्याची ताकद जास्त आहे.
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा एक मोठा निर्णय शरद पवार नजीक भविष्यात घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. शरद पवार यांच्या गटाची पुण्यात बैठक सुरु आहे. असं झाल्यास राज्यातील समीकरण बदललं जाईल. सध्याच्या घडीच्या राजकारणात भाजपाची जी घौडदौड सुरु आहे, ती रोखण्याच्या दृष्टीने शरद पवारांचा हा मास्टर स्ट्रोक ठरु शकतो. शरद पवार यांनी जो पक्ष स्थापन केला, तो आता त्यांच्या हातातून गेलाय. मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात काकापेक्षा पुतण्याची ताकद जास्त आहे. शरद पवार आज 82 वर्षांचे आहेत. त्यांना पुन्हा नव्याने सर्व सुरुवात करावी लागणार आहे. पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह घेऊन त्यांना मैदानात उतराव लागेल. सध्या दिलेलं नाव फक्त राज्यसभा निवडणुकी पर्यंत आहे.
या वयात नव्याने पक्ष बांधणी करणं सोप नाहीय. शरद पवार यांचा उत्साह आजही कायम दिसतो. पण त्यांच वाढत वय दिसून येतय. नव्याने पक्ष उभारणीसाठी त्यांना महाराष्ट्र दौरा करावा लागेल. आज हातातून पक्ष गेल्यामुळे शरद पवारांबद्दल एक सहानुभूतीची लाट आहे. पण सहानुभूती मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी शरद पवारांना गावोगावचे दौरे करावे लागतील. नव्या नेत्यांना ताकद द्यावी लागेल. त्यासाठी 16 ते 18 तास काम कराव लागले हे सोपं नाहीय. त्या तुलनेत काँग्रेसमध्ये आपला गट विलीन केल्यास जास्त फायदा आहे.
कोणाला फायदा होईल?
महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद सध्या खूपच कमी झालीय. कधीकाळी राज्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व ठेवणारा काँग्रेसपक्ष भाजपच्या झंझावातापुढे दुबळा ठरतोय. अशावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेसच्या एकगठ्ठा मतदानात वाढ होईल. शरद पवारांच्या सहानुभूतीचा काँग्रेसला फायदा होईल. शरद पवार गटाचे सुद्धा काही उमेदवार सहज निवडून येतील.
भाजपा आपल्या स्वप्नापासून अधिक दूर होईल?
महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर सरकार आणण्यासाठी 145 चा आकडा गाठावा लागणार आहे. काँग्रेस राज्यात जितकी खच्ची होईल, तितका भाजपाचा फायदा आहे. भाजपाचा विस्तार होत जाणार आहे. शरद पवार यांनी आपली ताकद काँग्रेसला दिल्यास काँग्रेस अजून बळकट होईल, भाजपा आपल्या स्वप्नापासून अधिक दूर होईल. त्यामुळे शरद पवार यांनी असा निर्णय घेतल्यास तो दोघांच्याही फायद्याचा आहे.