फडणवीसांसह महाराष्ट्रातील 3 नेते दिल्लीत, जेपी नड्डांशी खलबतं, कारण काय?
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे 3 बडे नेते आज (8 जानेवारी) दिल्लीत दाखल झालेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे 3 बडे नेते आज (8 जानेवारी) दिल्लीत दाखल झालेत. यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी खलबतं करत आहेत. त्यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलंय. महाराष्ट्रातील हे नेते जे. पी. नड्डा यांच्यासोबत विविध विषयांवर बैठक करत आहेत. यात स्थानिक निवडणुकीतील पराभवापासून अनेक विषयांवर चर्चा होत आहे (Important meeting of Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Chandrakant Patil with J P Nadda in Delhi).
भाजपच्या दिल्लीतील या बैठकीत स्थानिक निवडणुकांमध्ये पराभव आणि आगामी निवडणुका यावर चर्चा होत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला ताकद देण्यासाठी नवी रणनीती तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येतेय. फडणवीसांनी याशिवाय इतर लोकांच्याही भेटी घेतल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली भेटीबाबत एक ट्विट करत काही मंत्र्यांना भेटल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना वस्त्र मंत्रालयात भेटलो. याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचीही त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.”
?New Delhi. Today, met Union Minister Hon @smritiirani ji & Tripura CM @BjpBiplab at @TexMinIndia office. Also met Union Minister @ianuragthakur at his office. pic.twitter.com/uBjMjYoGNe
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 8, 2021
दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना लस मोफत देण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. फडणवीस यांनी राज्य सरकारने महाराष्ट्रात कोरोना लस मोफत द्यावी, अशी मागणी केली होती. यावर केंद्र सरकार राज्याला निधी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता फडणवीस यांनी ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब असल्याचं म्हणत टीका केली होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लसी संदर्भात सर्व प्रोटोकॉल केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ठरवले आहेत. पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे. महाराष्ट्राने देखील केंद्र सरकारची मदत घ्यावी. किमान गरीब आणि मध्यम वर्गाला ही लस मोफत द्यावी, अशी आमची मागणी आहे.”
“कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रामध्ये बघितले. समाजाच्या अनेक क्षेत्रातून अनेकांनी कामे केली. जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रामध्ये 54 लाख लोकांपर्यंत शिधा वाटप करावे लागेल असं सांगितलं. त्यावर आपण काम केलं. त्यामुळे या गंभीर परिस्थितीत आपण संकटाला तोड देत काम केलं. त्यामध्ये नवदुर्गांनी देखील चांगले काम केले. समाजात जे चांगले काम करतात त्यांचे कौतुक झाले पाहिजे. मी या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करतो. कोरोना काळात सेवा करणाऱ्या या आई चरणी कोरोना दूर होवो अशी प्रार्थना करतो. या आईची शक्ती घेऊन जोमाने काम करूयात,” असंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा
भाजपचं दोन दिवस मॅरेथॉन मंथन, कोअर कमिटीचे बडे नेते हजर, विनोद तावडेंना स्थान नाही
जेव्हा शाह-फडणवीसांनी आमीष दाखवूनही विलासकाकांनी भाजपला नकार दिला…
Important meeting of Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Chandrakant Patil with J P Nadda in Delhi