भाजपात जाणार की राष्ट्रवादीतच राहणार? उदयनराजेंचा आज अंतिम निर्णय
राष्ट्रवादीमध्ये (NCP) मोठ्या प्रमाणात गळती सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भूमिकेने पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
सातारा : राष्ट्रवादीमध्ये (NCP) मोठ्या प्रमाणात गळती सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भूमिकेने पक्षाच्या अडचणींमध्ये वाढच झाली आहे. यात खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) देखील शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचाही उपयोगी झाला नाही. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं म्हटलं. आज ही महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये (BJP) जाणार की राष्ट्रवादीतच राहणार याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी 11 वाजता पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. मात्र, बैठकीच्या ठिकाणाबद्दल गोपनीयता पाळण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर उदयनराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
उदयनराजे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीत राहणार यावरच साताऱ्यातील राजकारणाची भविष्यातील गणितं ठरणार आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीवरही उदयनराजेंच्या भूमिकेचा मोठा परिणाम होणार आहे.
दरम्यान, उदनराजे भोसले याआधी म्हणाले होते, “मी माझ्या अटींवर प्रवेश करेन. मी काय करावं हे कुणी दुसरं सांगू शकत नाही. मला काय करायचं ते मी ठरवणार आहे. मला शोभेल असं आणि लोकहिताच्या अटी मान्य झाल्यास मी निर्णय घेईन. शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची अट आहे. मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. त्यांनी ठरवावं आणि मला सांगावं. जायचं असेल तर हो, नसेल तर नाही.”