लाहोर: पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत (Pakistan)आज मोठा ड्रामा पाहायला मिळाला. पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंबलीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी (kasim khan suri) यांनी फेटाळून लावला आहे. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानच्या संविधानाच्या आर्टिकल 5च्या विरोधात असून असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी स्पीकर असद कैसर यांच्या विरोधातही अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे सूरी यांनी कामकाज पाहिलं. सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक निवडणुका होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. स्वत: इम्रान खान यांनी वृत्तवाहिनीवरून देशाला संबोधित करताना ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी मोठा दिवस होता. इम्रान खान सत्ता टिकवण्यात यशस्वी होतात की सत्तेतून पायउतार होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच पाकिस्तानातील विरोधी पक्षाने तर अविश्वास प्रस्ताव हरल्यानंतर इम्रान खान यांना अटक होईल असं सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे पाकिस्तानातील राजकीय घडामोडीकडे आज संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीचं कामकाज उशिराने सुरुवात झालं. यावेळी सिक्रेट व्होटिंग ऐवजी ओपन व्होटिंग होणार असल्याचं सांगितलं जात होतं. कोणता खासदार कुणाच्या बाजूने मतदान करत आहे हे कळावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. कोणताही दगाफटका होणार नाही याची काळजी घेण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला होता. मतदानामुळे संसदेबाहेर इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले होते. संसदेबाहेर घोषणाबाजीही सुरू होती.
मतदानापूर्वी इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये गंभीर विषयावर चर्चा झाली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मात्र संसदेचं कामकाज सुरू होताच उपाध्यक्षांनी इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. हा अविश्वास प्रस्ताव म्हणजे परदेशी षडयंत्रं असल्याचं सांगत उपाध्यक्ष कासिम खान यांनी प्रस्ताव फेटाळून लावल संसदेत मतदान होऊ दिलं नाही. त्यानंतर त्यांनी संसदेचं कामकाज तहकूब केलं. आता संसदेची पुढची बैठक येत्या 25 एप्रिल रोजी आहे.
त्यानंतर इम्राना खान यांनी देशवासियांना संबोधित करताना संसद बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती दिली. माझ्या विरोधात परदेशातून षडयंत्रं झालं आहे. त्यामुळे देशातील जनतेने आता निवडणुकीची तयारी करावी, असं आवाहन इम्रान खान यांनी केलं.
Pakistan PM Imran Khan advises President to dissolve National Assembly
Read @ANI Story | https://t.co/kcTj4CnBgJ#ImranKhanPrimeMinister #imrankhan #NoConfidenceMotion #NoTrustMotion #PakistanPoliticalCrisis pic.twitter.com/9t5Qj2Eoej
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2022
संबंधित बातम्या:
Imran Khan : जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ लपून मोदींना भेटले, इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावा
अविश्वास ठरावाबद्दल इमरान खान म्हणतात, शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार; पण राजीनामा देणार नाही