Maharashtra Election 2024 : कोकणात अजित पवार गटाला खिंडार, शिंदे सेनेला ‘या’ मतदारसंघात बसणार मोठा फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही एकापक्षात फाटाफुट झाली, तर त्याचा परिणाम युती आणि आघाडीवर होणार आहे. कोकणात अशीच एक घडामोड घडली आहे, ज्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच नुकसान होऊ शकतं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घडामोड घडली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. उमेदवार याद्या जाहीर होऊ लागल्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी, उमेदवारीसाठी इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांच्या इनकमिंग-आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. काही पक्षांमध्ये बंडाळी होत आहे. 22 ऑक्टोंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 29 ऑक्टोंबरपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल करता येतील. 4 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांसमोर या बंडोबांना थंड करण्याच आव्हान आहे. कोकणातील अनेक मतदारसंघात शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असा थेट सामना आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत आहे. खेड-दापोली-मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघात थेट शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असाच सामना आहे.
आता खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघातून एक बातमी आली आहे. ही बातमी रामदास कदम पर्यायाने एकनाथ शिंदे यांची चिंता वाढवणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खेड दापोली मतदारसंघात मोठा धक्का बसला. दापोली विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीत मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष, दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखंगे सह सात नगरसेवकांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.
ठाकरे गटाची ताकद वाढणार
पत्रकार परिषद घेऊन नगरसेवकांनी निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ पैकी सात नगरसेवक उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांनी वेगळा गट निर्माण करून उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दापोलीमधून निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी चांगली बातमी नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोन्ही नेते महायुतीमध्ये आहेत. दापोलीमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने योगेश कदम यांना उमेदवारी दिली आहे, ते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. उद्धव ठाकरे गटाने दापोलीतून संजय कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दापोलीतील सात नगरसेवकाने उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना बळ मिळणार आहे .