Uddhav Thackeray : ‘धोकेबाज’, मुंबईत मुस्लिम वस्तीत मशिदीबाहेर लागले ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स
Uddhav Thackeray : मुंबईत मुस्लिम बहुल वस्तीत उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लागले आहेत. त्यावर धोकेबाज असं लिहिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी जोरदार राजकारण रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले.
नुकतच मोदी सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम 1995’ च्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक लोकसभेत सादर केलं. त्यावरुन आता महाराष्ट्रात राजकारण सुरु झालं आहे. ‘वक्फ बोर्ड अधिनियम 1995’ या विधेयकावरुन महायुतीकडून उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. उद्धव ठाकरे गट मागच्या पाच वर्षांपासून काँग्रेस, शरद पवारांसोबत आहे. वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाला काँग्रेससह काही पक्षांचा, संघटनांचा विरोध आहे. 8 ऑगस्टला गुरुवारी वक्फ बोर्ड संशोधन विधेयक लोकसभेत मांडलं. त्यावेळी ठाकरे गटाचे 9 खासदार चर्चेला अनुपस्थित होते. त्यामुळे ठाकरे गटाची या विधेयकाबाबत नेमकी भूमिका काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले.
उद्धव ठाकरे गटाला नेहमीच हिंदुत्ववादाचा विचार मानणारा मतदार आणि मराठी माणसाने साथ दिली आहे. ‘वक्फ बोर्ड अधिनियम 1995’ संशोधनाच्या विरोधात गेल्यास या हिंदुत्ववादी मतदारांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. त्याचवेळी लोकसभेत हे विधयेक चर्चेला आल्यानंतर त्यावर काही न बोलता ठाकरे गटाचे सर्व खासदार निघून गेल्याने आता मुस्लिम समाजातून प्रश्न विचारले जात आहेत. मुंबईत मुस्लिमांचा एक गट याबद्दल विचारणा करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी सुद्धा गेला होता. ‘वक्फ बोर्ड अधिनियम 1995’ च्या संशोधनामुळे ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाला या विधेयका संदर्भात ठोस भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसू शकतो.
‘ठाकरे गटाचे खासदार 9 2 11’
महाराष्ट्रात यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. मुंबईतील वर्सोवा विधानसभा क्षेत्रात पुन्हा ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लागले आहेत. मुस्लिम बहुल परिसर असलेल्या भागात मशिदिबाहेर हे बॅनर्स लागले आहेत. बॅनरवर ठाकरेंना वक्फ बोर्डाच्या निर्णयावरून सवाल विचारण्यात आला आहे. मुसलमानांची मतं भरभरून घेतली, पण जेव्हा मुसलमानांच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली, वक्फ बोर्डावर बोलण्याची पाळी आली, तेव्हा साहेबांचे 9 खासदार पळून गेले. 9 2 11 झाले… सगळे असा आशय या बॅनरवर आहे. मध्यरात्री शिवसेनेच्या वर्सोवा विधानसभा कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी झाल्याची प्राथमिक माहिती.