मुंबई: तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होत आहे. उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात 20 ते 25 जणांचा समावेश करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या (bjp) सर्वाधिक आमदारांचा शपथविधी होणार आहे. तर शिंदे गटातील मोजक्याच आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यातून मात्र, अपक्ष आमदारांना वगळण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या एकाही अपक्ष आमदाराचा पहिल्या टप्प्यात शपथविधी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बच्चू कडू (bacchu kadu) यांचा शपथविधी सोहळा होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अधिवेशन झाल्यानंतर अपक्षांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
उद्याच्या विस्तारात 20 ते 25 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात शिंदे गटाचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आणि भाजपचे किती आमदार मंत्रीपदाच शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, शिंदे गटाने पहिल्या टप्प्यात अपक्षांना संधी न देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. अपक्षांना अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाणार आहे. तोपर्यंत कोर्टाचा निकालही येईल. त्यामुळे अपक्षांना सोबत घेणं सोयीचं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
पहिल्या यादीत अपवाद वगळता जुन्या मंत्र्यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. खान्देशातून विजयकुमार गावित, गिरीश महाजन अणि अमरीश पटेल यांना भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव पाटील अणि दादा भुसे यांना शिंदे गटाकडून संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिंदे गट आणि भाजपकडून या विस्तारात खान्देशवर अधिक फोकस ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. खान्देशात एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. गृहखात्यावरून तिढा कायम होता. शिंदे यांना गृहखातं हवं होतं. शिवसेना आणि भाजप युतीचा जो फॉर्म्युला होता त्याप्रमाणेच हा फॉर्म्युला असावा असं शिंदे गटाचं म्हणणं होतं. युतीच्या सत्तेत फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे नगरविकास आणि गृहखातं होतं. तोच फॉर्म्युला आताही असावा म्हणून शिंदे गट आग्रही होता. पण गृहखातं आपल्याकडे घेण्यास फडणवीस यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे.