दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 3 जानेवारी 2024 : इंडिया आघाडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याचा तयारीत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची फोनवरुन चर्चा झाली आहे. पुढच्या दोन दिवसात काँग्रेस वगळता इतर प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे. काँग्रेसची संथ गतीने निर्णय घेण्याची पद्धत अमान्य असल्याने प्रादेशिक पक्षांनी हे पाऊल उचललं आहे. नितीश कुमार यांना संयोजित म्हणून सर्वांची संमती असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
इंडिया आघाडी स्थापन होऊन आतापर्यंत सहा महिने झाले आहेत. या सहा महिन्यात इंडिया आघाडीच्या पटणा, बंगळुरु, मुंबई आणि दिल्लीत अशा चार ठिकाणी चार बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. पण तरीदेखील हव्या तशा गतीने निर्णय आणि कामे होत नसल्याने आघाडीतील काही पक्षांनी आता वेगळी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला झटका देण्याची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसात प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसला वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रादेशिक पक्षांच्या या वेगळ्या भूमिकेला काँग्रेसचा वेळकाढूपणा हे कारण आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांचं एकमेकांशी गेल्या 24 तासांमध्ये फोनवर संभाषण झालं आहे. या पक्षांनी काँग्रेस वगळता व्हर्च्युअल बैठकीचं आयोजन केलं आहे. इंडिया आघाडीच्या सहा महिन्याच्या वाटचालीत अजूनही संयोजक किंवा इंडिया आघाडीचा चेहऱ्याची घोषणा झाली नाही. आघाडीच्या चेअरमनपदी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाबाबत चर्चा झाली. पण काँग्रेसने आमच्यात अंतर्गत वर्किंग कमिटीत निर्णय होईल, त्यानंतर आम्ही कळवू, अशी भूमिका घेतली.
जागावाटपाचा फॉर्म्युला 31 डिसेंबरपर्यंत ठरणार होता. पण अजूनही त्याबाबत कुठलीही सहमती झाली नाही. 31 डिसेंबर उलटून गेल्यानंतरही त्याबाबत धोरणात्मक निर्णय नाही. त्यामुळे संथपणे निर्णय घेण्याची काँग्रेसची पद्धत प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना अमान्य आहे. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पण तरीही इंडिया आघाडीची रणनीती ठरत नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी बैठकीचं आयोजन केलं आहे. यातून काँग्रेस काही बोध घेणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.