मुंबईत ‘इंडिया’ एकवटणार, तिसरी बैठक ऑगस्टमध्ये; संयोजक कोण? नितीशकुमार की…?
इंडिया आघाडीच्या गेल्या दोन्ही बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील बैठकीतही लोकसभेची रणनीती ठरवण्यात येणार आहे.
मुंबई | 28 जुलै 2023 : पाटणा आणि बंगळुरू येथील बैठक यशस्वी झाल्यानंतर आता इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असेल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजे 25-26 ऑगस्ट किंवा 26-27 ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी या बैठकीचे आयोजक असतील. या बैठकीची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. इंडिया आघाडीच्या दोन्ही बैठका यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या बैठकीत काय निर्णय होतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
इंडिया आघाडीची ही बैठक पवई येथील सप्त तारांकित वेस्ट ईन हॉटेलात होणार आहे. या बैठकीला इंडिया आघाडीचे सर्वच घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. इतर विरोधी पक्षही या बैठकीला येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीत आघाडीचं नाव ठरवण्यात आलं होतं. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली होती. आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
नितीश कुमार की?
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे संयोजकपदाच्या शर्यतीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून त्यांच्या नावाची चर्चाही सुरू होती. बंगळुरूतील बैठकीत संयोजक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण तसं घडलं नाही. त्यामुळे मुंबईतील बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की संयोजक म्हणून काँग्रेसमधून कुणाचं नाव सूचवलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रणनीती ठरणार
इंडिया आघाडीच्या गेल्या दोन्ही बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील बैठकीतही लोकसभेची रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसेच आघाडीत कोणत्या कारणाने बेबनाव होऊ नये याबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय आघाडीचा अजेंडा ठरवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात येणार आहे. आघाडीच्या या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.