मुंबई | 19 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल एनडीएची बैठक पार पडली. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या आघाडीत सर्व भ्रष्टाचारीच असल्याचा आरोप मोदी यांनी केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तुम्ही आमच्यावर आरोप करताय. तुमच्या बाजूलाच 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, तुमच्यामागे इक्बाल मिर्ची उभा होता. त्याचं काय? ही ढोंगं आता बंद करा, असा हल्लाबोलच संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केला.
भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षात एनडीए आठवली नव्हती. मित्र पक्ष आठवले नव्हते. आपले सहकारी आठवले नव्हते. पण आम्ही पाटण्याला जमलो. बंगळुरूत भेटलो. त्यानंतर मोदी आणि शाह यांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएतील सध्याच्या लोकांनी मोदींचा सत्कार केला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत. मोदींनीच काय व्होट फॉ इंडिया म्हटलं पाहिजे. मोदी म्हणतात, मी इंडिया. मोदी इज इंडिया. हा इंडियाचा अपमान नाही का? त्याचा अर्थ काय होतो? असा सवाल राऊत यांनी केला.
मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजप म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक भारतीय इंडिया आहे. संपूर्ण देश काल जमला. ते भ्रष्टाचाराचं संघटन होतं असं मोदी म्हणाले. अरे तुमच्या बाजूला 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा होता. पाठीमागे इक्बाल मिर्ची उभा होता. हे सगळे भ्रष्टाचारी बाजूला घेऊन आमच्यावर आरोप करताय? हे ढोंग बंद करा. तुमचं ढोंग सर्वांना कळतंय, अशी टीका राऊत यांनी केली.
तुम्हाला आता एनडीएची आठव झाली ना? आम्ही 26 लोकं आल्यावर तुमचं एनडीएचं कमळ फुलायला लागलं. आम्ही भारत म्हणून एकत्र आलो तेव्हा तुम्हाला इंडिया आठवली आहे. इंडिया जिंकणार, भारत जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार. हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा. तुमच्याकडे जेलमध्ये जाता जाता खेचलेले लोक आले. अमित शाह जेलमध्ये जाऊन आले. आम्ही काय म्हटलं का? अजितदादा आणि हसन मुश्रीफ तुरुंगात जातच होते, असंही ते म्हणाले.
इंडिया नावावरून वाद करण्याचं काम काय? भारतीय जनता पार्टी नावात इंडिया नाही का? मोदी इज इंडिया हे काय आहे? हुकूमशाहीच्या सरकार विरोधात इंडिया लढणार आणि इंडिया जिंकणार. भाजप इंडियाच्या विरोधात षडयंत्र करत आहे. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना चार बोटं तुमच्याकडे आहेत हे लक्षात घ्या. एनडीए घोटाळेबाजांची पार्टी आहे, असंही त्यांनी सांगितलं.