महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवाय; ठाकरे गटाची मोठी मागणी
आताही परतीच्या पावसाने पिकं वाहून गेली आहे. शेतीत अजूनही पाणी आहे. ओला दुष्काळ जाहीर करा ही आमची मागणी आहे.
मुंबई: टाटा एअर बस प्रकल्प (tata airbus project) राज्याच्या हातून गेल्याने राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार आल्यापासून राज्यातील चार प्रकल्प (Project) राज्याच्या हातून गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातचा रोजगार निघून गेला आहे. त्यामुळे राज्यांमधील जनतेत अस्वस्थता असून राज्यातील जनतेला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे. त्यामुळे तुम्ही उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ठाकरे सरकारमधील बड्या नेत्याने पहिल्यांदाच ही मागणी केली आहे. डबल इंजिनचं सरकार नीट सुरू होतं. कदाचित घटनाबाह्य सरकार आल्याने हे इंजिन फेल गेलं आहे. महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती. ती इतर राज्यात गेली आहे. कदाचित इतर राज्यात निवडणुकीसाठी ही गुंतवणूक गेली असेल. तिकडे अजून काही चांगलं द्यायचं असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्योजकांना या सरकारवर विश्वास नाही. गुंतवणूकदारांचा या सरकारवर विश्वास नाही. थोड्या दिवसाचं हे सरकार आहे. त्यांच्या अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी राज्याचं नुकसान होत आहे, असं सांगतानाच मला तुम्ही काहीही चिडवा, कोणत्याही नावानं बोला. पण महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. त्याकडे लक्ष द्या, असंही ते म्हणाले.
एअर बस टाटाचा प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा असं आम्ही सांगत आहोत. शेतीचं नुकसान होत आहे. दुसरीकडे उद्योग जगतातील चौथा मोठा प्रकल्प निघून गेला आहे. पहिला प्रकल्प वेदांता फॉक्सकॉनचा होता. तो गुजरातला गेला. बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प हा चार अन्य राज्यांमध्ये गेला. पण राज्यात आणला गेला नाही. मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प आम्ही औरंगाबादेत आणणार होतो. त्यासोबत इंडस्ट्री आली असती. पण तोही हातचा गेला. आता एअर बस प्रकल्प गेला आहे. अनेक राज्य कंपन्यांसोबत चर्चा करतात, करार करतात आणि प्रकल्प आणतात. पण आपल्या सरकारकडून असं काही घडताना दिसत नाही, असं आदित्य म्हणाले.
नाशिक आणि पुणे जिल्ह्यात आम्ही बांधावर गेलो. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही मागेही ओला दुष्काळाची मागणी केली होती. आमचं सरकारनं ऐकलं नाही. घटनाबाह्य सरकार असलं तरी ते खुर्चीवर बसलेले होतं. त्यांनी आमचा आवाज ऐकला नाही. आताही परतीच्या पावसाने पिकं वाहून गेली आहे. शेतीत अजूनही पाणी आहे. ओला दुष्काळ जाहीर करा ही आमची मागणी आहे. कोणताही मंत्री शेतावर गेला नाही. शेतकऱ्यांना धीर दिला नाही. गेल्या दोन तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यात हे नैसर्गिक संकट आलं आहे, असं त्यांनी सांगितलं.