Ayodhya Hindutva Politics : हिंदुत्ववाद्यांचं पुन्हा एकदा केंद्र होतंय का अयोध्या? आदित्य ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंचीही अयोध्या दौऱ्याची घोषणा
Ayodhya Hindutva Politics : नव्वदच्या दशकापासून अयोध्या हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या देशव्यापी रथ यात्रेमुळे आधी अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर बाबरी मशीद पाडल्यानंतर अयोध्या चर्चेत आलं.
मुंबई: नव्वदच्या दशकापासून अयोध्या हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या देशव्यापी रथ यात्रेमुळे आधी अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर बाबरी मशीद पाडल्यानंतर अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर कोर्टात सुरू असलेला खटला आणि त्यावर आलेला निकाल यामुळे पुन्हा अयोध्येची चर्चा सुरू झाली. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट दिली आणि पुन्हा अयोध्या चर्चेत आलं. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही (aaditya thackeray) अयोध्येला जाणार आहे. उत्तर भारतातील हिंदुत्ववादी (Hindutva Politics) नेत्यांचं अयोध्या हे केंद्र होतं. आता महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी नेत्यांचंही अयोध्या केंद्र होताना दिसात आहे.
राज ठाकरे अयोध्येला जाणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. येत्या 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या सोबत मनसेचे पदाधिकारी असणार आहेत. राज ठाकरे यांनी स्वत:हून ही घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरेंची मे महिन्यात अयोध्यावारी
राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते आदित्य ठाकरेही अयोध्येला जाणार आहेत. आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरलेली नाही. मात्र, मे महिन्यात ते अयोध्येला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासोबत युवा सैनिक मोठ्या प्रमाणावर असतील असं सांगितलं जात आहे.
अयोध्याच का?
शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. सेनेचं गेल्या 25-30 वर्षाचं राजकारण हिंदुत्वाभोवतीच फिरलेलं आहे. मात्र, सध्या शिवसेनेची युती धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आहे. या अनपेक्षित युतीमुळे अनेकांच्या भुवय्या उंचावलेल्या आहेत. शिवसेनेने साथ सोडल्याने सत्ता हातातून निसटल्याचं भाजपला शल्य आहे. त्यामुळेच भाजपने शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष नसून आम्हीच खरे हिंदुत्ववादी असल्याचा प्रचार जोरात सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हातून हिंदुत्व निसटत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, आपण प्रखर हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू असतात. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा त्याचाच एक भाग असल्याचं सांगितलं जातं. महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून अयोध्यावारीचं प्रयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
मनसे हा निव्वळ हिंदुत्ववादी पक्ष नाही. मात्र मनसेचं नेतृत्व हे हिंदुत्ववादी विचारधारेच्या मुशीतूनच तयार झाले आहे. मनसेच्या स्थापनेनंतर परप्रांतिय, नंतर विकासाचे मुद्दे घेऊन राज ठाकरे यांनी राजकारणात उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक अधोरेखित व्हावी म्हणून ते अयोध्येला जात असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय मनसे आणि भाजपशी जवळीक वाढण्यासाठी हिंदूत्व हा महत्त्वाचा धागा ठरू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
अयोध्याचं राजकीय महत्त्व काय?
अयोध्येचं राजकीय महत्त्व अन्ययसाधारण आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून अडवाणी यांनी रथ यात्रा काढली. देशभर झालेल्या या रथ यात्रेमुळे अयोध्या हे देशाच्या आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं. त्यानंतर बाबरी मशीद पडल्याने पुन्हा अयोध्या चर्चेत आलं. या घटनेनंतर भाजपला केंद्रात सत्ताही मिळाली. त्यामुळे अयोध्येचं राजकीय महत्त्व अधोरेखित झालं. अयोध्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा अयोध्या चर्चेत आलं. आता अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांमुळेही अयोध्या येनकेन प्रकारे चर्चेत असतं. हिंदुत्ववादी नेत्यांसाठी अयोध्या हे अत्यंत महत्त्वाचं स्थान बनलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी नेते अयोध्येकडे आकर्षित झाले नसते तर नवलंच.
संबंधित बातम्या: