Big Breaking : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी कुणाची?; देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा खुलासा
घरी आल्यावर माझ्या नेत्याने सांगितलं तुला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. हा माझ्यासाठी धक्का होता. मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होणार याचं मला दु:ख नव्हतं. खालच्या पदावर जातो याचं दु:ख नव्हतं.
मुंबई | 23 जुलै 2023 : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिंदे यांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपद बहाल केलं. मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. फडणवीस यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले असून फडणवीस यांना पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांना उभं केलं जात आहे, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. आजही दबक्या आवाजात असेच अंदाड वर्तवले जात आहेत. पण या खेळीमागची इन्साईड स्टोरी काय होती? शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव कुणाचा होता? यावर फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तानाट्याच्यावेळी काय काय घडलं याची धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात त्यांनी एकावर एक गौप्यस्फोट केले.
मी मुख्यमंत्री होणार नाही हे मी ठरवलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं. हे सरकार बदललं पाहिजे, हे सरकार आपल्या विचाराने चालू शकत नाही. तिथे हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरतोय, यावर आमचं एकमत झालं. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे हा विषय मी मांडला. मी माझ्या पक्षाकडे गेलो. माझ्या पक्षाला मी सांगितलं शिंदेंना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे. माझ्या पक्षाला कन्व्हिन्स करण्यासाठी मला बराच काळ द्यावा लागला. माझ्या पक्षाने माझा प्रस्ताव लगेच स्वीकारला नव्हता. एकनाथ शिंदे एवढं मोठं पाऊल उचलतात. अशा परिस्थितीत त्यांचं नेतृत्व असलं पाहिजे. त्यांच्या लोकांना ते आत्मविश्वास देतील. आणि हा निर्णय झाला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मला अध्यक्ष व्हायचं होतं
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर मी सरकारमध्ये राहणार नाही, असं मी माझ्या पक्षाला स्पष्टपणे सांगितलं होतं. मी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होईल किंवा मला जी जबाबदारी द्याल ती घेईल. दोन वर्ष मेहनत करून पक्षाला क्रमांक एकचा पक्ष करतो, असं पक्षाला सांगितलं. त्याप्रमाणे सर्व ठरलं होतं, असा दावा फडणवीस यांनी केला.
राज्यपाल म्हणाले हे काय आहे?
ज्यावेळी आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांना पत्र द्यायला गेलो. तेव्हा मी मुख्यमंत्री होणार नाही. शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हे मी चार लोकांना सांगितलं होतं. राज्यपालांकडे जाईपर्यंत मला, एकनाथ शिंदे आणि आमच्या तीन वरिष्ठांना ही गोष्ट माहीत होती. कुणाला याबाबत काहीच माहीत नव्हतं. राज्यपालांना पत्र दिलं. ते पत्र पाहून राज्यपालही आश्चर्यचकीत झाले. मी त्यांना सांगितलं असंच ठरलं आहे. मी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचं नाव जाहीर केलं. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर चिंता, शोक दिसत नव्हता. माझा चेहरा विजयी होता. मला जिंकल्याचा आनंद होता. पण तो जास्त काळ टिकला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
तो माझ्यासाठी धक्का होता
घरी आल्यावर माझ्या नेत्याने सांगितलं तुला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. हा माझ्यासाठी धक्का होता. मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होणार याचं मला दु:ख नव्हतं. खालच्या पदावर जातो याचं दु:ख नव्हतं. पक्षाने सांगितलं तर मी चपरासी होईल. चिंता याची होती की लोक म्हणतील हा सत्तेसाठी किती हपापला आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता सत्तेसाठी उपमुख्यमंत्री झाला. पण माझ्या नेत्यांनी जे नरेटिव्ह तयार केलं त्यामुळे माझी उंची वाढली. पंतप्रधानांनी ट्विट केलं, त्यानंतर लोकांचा संभ्रम दूर झाला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.