जळगाव: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या (shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांच्या मुक्ताईनगरमधील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. ज्या मैदानावर सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. तिथे महाआरतीचं आयोजन करण्यात आल्याचं कारण देत सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. अचानक सभेला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर सुषमा अंधारे या संतप्त झाल्या आहेत. सभा घेईल तर तिथेच, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यामुळे जळगावमधील (jalgaon) वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधला. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही सभा घेऊ, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे.
महाप्रबोधन यात्रा हा आमचा राज्याचा कार्यक्रम आहे. आम्ही तीन आठवडे आधीच परवानगी मागितली आहे. पोलिसांनी सभेला परवानगी नाकारण्याचे काही एक कारण नव्हतं.
दुसऱ्या गटाने महाआरतीचा कार्यक्रम ठेवला आहे असं कारण पोलिसांनी दिले. पण त्या मैदानावर कुठलही मंदिर नाही, त्यामुळे अचानक महाआरती कशी काय उद्भवली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सभेला परवानगी द्यावी म्हणून सकाळी पोलीस अधीक्षकांसोबत एक बैठक पार पडली आताही दुसरी बैठक होईल. पोलिसांनी निरपेक्ष बुद्धीने काम केलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून काम करू नये.
आम्ही हे प्रकरण अतिशय शांततेने हाताळत आहोत. कायद्याचा आदर करत आहोत. मग पोलीस हे प्रकरण इतकं का ताणतंय? जास्त ताणलं की तुटतं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्यासह पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभेलाही परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केलं आहे.
मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन सभेदरम्यान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची देखील सभा होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही गटाच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
परवानगी नाकारली तरी सुषमा अंधारे यांची सभा होणारच, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तर, कुणी समाजात तेढ निर्माण करत असेल तर वातावरण खराब होऊ नये ही जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. त्यामुळे आम्ही सभा घेणार नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे या राष्ट्रवादीच्या पार्सल आहेत अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यावर अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. मी राष्ट्रवादीत होते हा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आहे. मी राष्ट्रवादीत कधीही नव्हते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी राष्ट्रवादीत कधीच नव्हते हे मी वारंवार सांगून झालंय. तरीही ते मला राष्ट्रवादीची म्हणत असतील तर गुलाबराव, ज्या पक्षात तुम्ही होते त्या पक्षाचे लोक आज तुम्हाला शिव्या घालतात. पण मी ज्या पक्षात नव्हते त्या पक्षातले लोक आणि विरोधक मला निकटवर्तीय म्हणतात. म्हणजे मी किती माणस कमावली आहेत, मी किती प्रेम कमवत आहे हे पाहा, असं सांगतानाच गुलाबरावांचं हे वक्तव्य मी कॉम्प्लिमेंट्री घेते, असा चिमटा त्यांनी काढला.