आमचे बाथरुम इतके भयंकर..; जया बच्चन यांची संसदेतील वॉशरुमबद्दल तक्रार
निलंबित केलेल्या खासदारांमध्ये शशी थरुर, मनिष तिवारी, कार्ती चिदंबरम, फारुक अब्दुल्लाह, सुप्रिया सुळे, डिंपल यादव यांचाही समावेश होता. भाजपप्रणित एनडीए सरकारने नव्या संसदभवनात खासदारांच्या निलंबनाचा वेगळाच इतिहास रचल्याची टीका यावेळी विरोधी खासदारांनी केली.
मुंबई : 21 डिसेंबर 2023 | संसदेत ‘इंडिया’तील खासदारांच्या निलंबनाचं सत्र मंगळवारीही सुरू राहिलं. कथित आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी लोकसभेतील आणखी 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली. गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये दोन्ही सदनांमधील एकूण 141 खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. खासदारांच्या निलंबनानंतर समाजवादी पार्टीच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी संसदेतील वॉशरुम्सचा मुद्दा उपस्थित केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “आमचे वॉशरुम्स खूप भयानक आहेत.” त्यानंतर त्यांनी आपल्याला बोलण्यापासून रोखल्याचा आरोप राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांच्यावर केला.
“आमचे वॉशरुम इतके भयंकर आहेत..”
“आम्ही सकाळपासून बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्यात किती संयम आहे ते बघू, असं सभागृह नेते आम्हाला म्हणाले. आज रात्री 11 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज चालणार आहे. ते पाणी पितात आणि दर पाच मिनिटाला वॉशरुमला जाण्यासाठी ब्रेक घेतात. आमच्या वॉशरुम्सची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे”, अशी तक्रार त्यांनी केली. कोणत्याही चर्चेशिवाय बिल पास करण्याच्या मुद्द्यावर त्या पुढे म्हणाल्या, “ते अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. जर तुम्हाला बिल पास करायचे असतील तर मग थेट पास करा. होकार आणि नकार घेण्याचा अर्थ काय आहे? हा सगळा ड्रामा कशासाठी?”
141 खासदारांचं निलंबन
संसदेतील 78 खासदारांचं निलंबन झाल्यानंतर मंगळवारी लोकसभेतील आणखी 49 खासदारांचं निलंबन झालं. गेल्या शुक्रवारी दोन्ही सदनांतील 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. सोमवारी लोकसभेतील 36 तर राज्यसभेतील 45 अशा एकूण 78 खासदारांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारीही गदारोळ चालू राहिल्याने लोकसभेतील 47 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे संसदेतील एकूण निलंबित खासदारांची संख्या 141 झाली.
नक्कल
संसदभवनाच्या मुख्यद्वाराच्या पायऱ्यांवर बसून केंद्र सरकारचा निषेध करत असताना तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांची नक्कल केली. त्याचा व्हिडीओ राहुल गांधींनी शूट केला. त्यामुळे बॅनर्जींची नक्कल संसदेच्या आवारात चर्चेचा विषय ठरला होता. याची राज्यसभेमध्ये धनखड यांनी गंभीर दखल घेतली. बॅनर्जी यांचं नाव न घेता, हे कृत्य अत्यंत लाजिरवाणं, लज्जास्पद, आक्षेपार्ह असल्याची संतप्त प्रतिक्रिया धनखड यांनी सभागृहामध्ये व्यक्त केली.