सोलापुरात AIMIM ला मोठं खिंडार, जयंत पाटलांच्या उपस्थितीत तौफिख शेख यांच्यासह 6 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना एमआयएमला मोठा हादरा दिलाय. पाटील यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना एमआयएमला मोठा हादरा दिलाय. पाटील यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तौफिक शेख (Taufiq Shaikh), तस्लीम शेख, नुतन गायकवाड, पुनम बनसोडे, वाहिदाबानो शेख, शहाजीदा शेख असं राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांची (AIMIM Corporator) नावं आहेत. सोलापूर सोलापुरातील एमआयएमचे नेते तौफिक शेख यांच्यासह एमआयएमच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं एमआयएमला मोठं खिंडार पडलं आहे.
AIMIM चे नेते आणि नगरसेवक तौफिक शेख हे सोलापुरातील मातब्बर नेते आणि काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आता आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या नगरसेवकांसह आज शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
‘महाराष्ट्रात झालेला बदल जनतेनं नाकारला’
या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिलीय. भाजपनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात दुसरा पक्ष फोटून सत्ता स्थापन केली हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही. हेच प्रतिबिंब या सभेत आपल्यासमोर आलं आहे. महाराष्ट्रात जो बदल झाला तो जनतेनं पूर्णपणे नाकारला आहे, असा याचा अर्थ आहे.
’15 ऑगस्टचं झेंडावंदन हे बिनखात्याचे मंत्री करणार’
मंत्रिमंडळ विस्तारावरुनही जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधलाय. 40 दिवस मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही. ज्यांना मंत्री केलं त्यांच्यात खाती मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असावी. त्यामुळे त्या सगळ्यांची समजूत घालायला अजून काही वेळ द्यावा लागेल असं मला वाटतं. त्यामुळे 15 ऑगस्टचं झेंडावंदन हे बिनखात्याच्या मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच होईल. काही पराक्रम आणि काही विक्रम करायचे असतात. एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत. ते हा विक्रमही महाराष्ट्रात करुन दाखवतील, असा जोरदार टोला जयंत पाटील यांनी शिंदेंना लगावलाय.
‘प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो’
प्रति शिवसेना भवनाच्या मुद्द्यावरुनही जयंत पाटील यांनी शिंदेना टोला हाणलाय. एकनाथ शिंदे यांची ताकद मोठी आहे. सुरत, गुवाहाटीला त्यांनी ताकद दाखवली आहे. त्यामुळे प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे. महाराष्ट्रात शिवसैनिक हे विसरणार नाही, असं पाटील म्हणाले.