मुंबई : जगभरात आज जागतिक निद्रा दिन साजरा केला जातोय. या जागतिक निद्रा दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारला ट्विटरवर कुंभकर्ण अशी उपमा दिली आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांकडून भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोक त्यांच्या ट्विटचं समर्थन करत आहेत. तर काही लोक टीका करत आहेत (Jayant Patil compare Modi Government as Kumbhakarna).
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
“शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?”, असा सवाल जयंत पाटील यांनी ट्विटरवर केला आहे. त्यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली (Jayant Patil compare Modi Government as Kumbhakarna).
More than 300 farmers have lost their lives in protest. Thousands of youngsters are losing jobs everyday. Petrol, diesel, LPG rates are the highest ever and the financial condition of country is in the ICU.
How to wake-up the kumbhakaran sarkar?#WorldSleepDay
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 19, 2021
कुंभकर्ण कोण?
कुंभकर्ण हे रामायणातील एक पात्र आहे. कुंभकर्म रावणाचा सर्वात लहान भाऊ होता. त्याला झोपेचं वरदान मिळालं होतं. त्यामुळे तो चक्क सहा महिने झोपायचा. सहा महिन्यांनी तो जेवण वगैरे करायचा. त्यानंतर पुन्हा झोपायचा आणि पुन्हा सहा महिन्यांनी उठायचा. तो प्रचंड उंच, धिप्पाड राक्षसासारखा होता. तो सहा महिने झोपायचा म्हणून जो व्यक्ती जास्त वेळ झोपतो त्याला व्यंगात्मक रुपात कुंभकर्ण म्हटलं जातं.
उर्मिला मातोंडकर यांचं देखील ट्विट
दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील काल ट्विट करत केंद्र सरकारला टोला लगावला होता. विशेष म्हणजे त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या फाटलेल्या जीन्सपबाबतच्या वक्तव्यावरुनही टीका करत दोन्ही विषयांवरुन एकाच ट्विटमधून निशाणा साधला होता. फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? असा खोचक सवाल उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवर विचारला होता. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मान्यवर… फटी हुई #jeans को तो देश का होनहार युवा संभाल लेगा.. लेकिन फटी हुई #economy का क्या..???#RippedJeansTwitter #rippedjeans
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) March 18, 2021
केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना आशा
देशात गेल्या वर्षभरापासून कोरोना संकट सुरु आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बऱ्याच उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे संकट अचानकपणे आल्याने अनेक गोष्टींसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. कोरोना काळात केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं. गरिबांसाठी मोफत धान्य देण्यात आलं. या कोरोना काळात अनेक कंपन्या बंद पडल्या, अनेकजण बेरोजगार झाले. त्याचबरोबर लॉकडाऊनची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागली. त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडे आशा आहे. केंद्राकडून पेट्रोल, डिझेल, रोजगार यासारख्या गोष्टींसाठी दिलासा मिळावा, अशी अनेकांची इच्छा आहे.
हेही वाचा : ‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ कसं सूचलं?; वाचा रंजक किस्सा!