विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मते फुटल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या सारख्या कष्टकरी नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यावर जयंत पाटील यांची पहिलीच प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांचा आरोप फेटाळून लावला आहे. शरद पवार कुठे आणि सदाभाऊ कुठे? कशाला? तुम्ही काय तरी चर्चा करता, असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी दिलेल्या सहकार्याचं कौतुक केलं. शरद पवार यांनी प्रचंड मदत केल्याचंही ते म्हणाले. मी शरद पवार यांना धन्यवाद देईल. त्यांनी माझ्यासाठी बराच वेळ खर्च केला. अनेक बैठका घेतल्या. दिवसातून दोन तीन वेळा संपर्क केला. हे फसवतील, ते फसवतील असं त्यांनी मला सांगितलं होतं, ते खरं ठरलं, असं जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार यांनी 70 वर्ष राजकारण केलं आहे. या वयातही त्यांनी रात्री 3 वाजेपर्यंत जागून मला साथ दिली. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मला मदत केली. मी आयुष्यात कधीच विचारणार नाही. शरद पवार यांनी काही टिप्स दिल्या. त्याप्रमाणे झालं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला आहे. आम्ही आत्मचिंतन करत आहोत. पुन्हा लढू. काही फरक पडत नाही. राज्यात असं राजकारण नव्हतं. थोड्या प्रमाणात लोक इकडे तिकडे करायचे. मी ज्या निवडणुका लढवल्या तेव्हा असं काही नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.
मी राष्ट्रवादीच्या 12 मतांवर उभा होतो. एक मत फुटलं. आमचीही मते फुटली. मला चार मते मिळाली असती तर मी दुसऱ्या पसंतीवर आलो असतो. काँग्रेसने समान मते द्यायला हवी होती. त्यांनी पहिली पसंती शिवसेनेला दिली. मी 14 मते घेऊनच निवडणूक लढवत होतो, असा दावाही त्यांनी केला.