‘त्या’ महिलेला आव्हाड म्हणाले, हमारी बहेन… जयंत पाटील यांनी जुना व्हिडीओच दाखवला; म्हणाले, विनयभंग कसा?
यावेळी पाटील यांनी कालच्या कार्यक्रमातील घटनाक्रमही सांगितला. जितेंद्र आव्हाड आधी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी त्या भगिनी गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीत येण्याचा प्रयत्न करतात.
ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या महिलेचा राष्ट्रवादी काँग्रेसने पर्दाफाश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भर पत्रकार परिषदेत एक जुना व्हिडीओ दाखवून जितेंद्र आव्हाड त्या महिलेचा माझी बहीण असा उल्लेख करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ दाखवल्यानंतर आव्हाड ज्या महिलेला बहीण म्हणतात तिचा विनयभंग कसा करतील? असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचं कळताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीहून आले. पाटील यांनी आव्हाड यांच्याकडून संपूर्ण प्रकरण समजून घेतलं. कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर आव्हाड आणि पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी जयंत पाटील यांनी आव्हाड यांच्या जुन्या कार्यक्रमाची क्लिप दाखवली. या कार्यक्रमात आव्हाड स्टेजवर भाषण करताना दिसत आहे. या स्टेजवर महिलाही दिसत आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड या महिलेचा बहीण असा उल्लेक करताना दिसत आहेत. हमारी बहेन तो मुंबई से आती है… असं आव्हाड या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. ही क्लिप दाखवल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल कसा? असा सवाल पाटील यांनी केला.
यावेळी पाटील यांनी कालच्या कार्यक्रमातील घटनाक्रमही सांगितला. जितेंद्र आव्हाड आधी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी त्या भगिनी गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीत येण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा स्थानिक खासदार हे आव्हाड यांच्याकडे येताना दिसतात.
तेव्हा गाडीकडे जाण्यासाठी आव्हाड खासदारांना वाट करून देतात आणि ते मागे वळतात. त्यानंतर आव्हाड या महिलेला बाजूने जा, गर्दीत का येतात असं म्हणतात आणि पुढे जातात. त्यात कोणत्याही प्रकारची वेगळी कृती दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
व्यथित होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिल्याचं कळलं. माझ्याकडे राजीनामा पाठवला. त्यामुळे मी सांगलीहून आलो. वाटेत कालच्या कार्यक्रमाच्या क्लिप्स पाहिल्या. मला काही लोकांनी माहिती दिली.
जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाला गेले होते. ज्या भगिनीने गुन्हा दाखल केला आहे. त्या क्लिप सर्वांना उपलब्ध आहेत. त्यातून त्यांनी विनयभंग केल्याचं दिसत नाही, असंही त्यांनी सांगितलं.