आधी विनयभंगाचं कलम वाचून दाखवलं; नंतर जयंत पाटील पोलीस आणि सरकारला म्हणाले, सांगा, कालची घटना या…
काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते? आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गर्दी झाल्यावर माणसाला बाजूला काढण्याच्या प्रयत्नात धक्काबुक्की होते.
ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीरपणे घेतली असून आव्हाडांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ ठाण्यात येऊन जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. तसेच आव्हाडांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. आव्हाडांवर करण्यात आलेली कारवाई भादंविच्या कलम 354 मध्ये बसत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी आव्हाडांवरील कारवाईवरून राज्य सरकार आणि पोलिसांना घेरलं. तसेच आव्हाड या महिलेचा भगिनी असा उल्लेख करत असल्याचा जुना व्हिडीओही दाखवला.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर रात्री उशिरा या महिलेने आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला, असं सांगत त्यांनी संशयाची सुईही निर्माण केली. तसेच यावेळी त्यांनी कलम 354 वाचून दाखवून पोलिसांना खरमरीत सवालही केला आहे.
“एखाद्या स्त्रीस लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे. या कायद्यानुसार सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे तक्रारदार ही स्त्री आहे म्हणजे झाले असे नाही. तर सदर घटनेतील पुरूषाने त्या स्त्रीसोबत जे वर्तन केले ते स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारे आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारे होते. हे न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे. स्त्री किंवा पुरुषाशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे म्हणजे विनयभंग करणे असे म्हणता येईल .विकृत स्पर्श करणे, चोरून नजर ठेवणे, कामूक भावनेने बोलणे किंवा तसा टोमणा मारणे, मन दुखावेल असे बोलणे किंवा कृती करणे याला पण विनयभंग म्हणता येईल”, असं हे कलम सांगतं.
“एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खासगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन होईल असे वर्तन, अंगविक्षेप करणे, व्हिडीओ, चित्र, लेखन दाखवणे, त्यावर कॉमेंट मागणे, तिचा किंवा त्याचा पिच्छा पुरवणे, एकसारखे अश्लील शब्द वापरणे (फोन किंवा प्रत्यक्ष) अशा गोष्टी पण विनयभंगाखाली येऊ शकतात,” असंही हे कलम सांगतं, असं जयंत पाटील म्हणाले.
आता माझा पोलीस आणि राज्य सरकारला प्रश्न आहे. काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते? आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गर्दी झाल्यावर माणसाला बाजूला काढण्याच्या प्रयत्नात धक्काबुक्की होते. देवळातही धक्काबुक्की होते. दर्शन करतानाही पुजारी भाविकांना लवकर पुढे जावं म्हणून बाजूला ढकलत असतो, मग या प्रकारांना काय म्हणणार? असा सवाल त्यांनी केला.
पोलिसांनी हे प्रकरण 354 मध्ये कसं बसवलं? कायद्याची मोडतोड करून एखाद्याला गुन्हेगार ठरवण्याचं काम जाणीवपूर्वक होत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रात कायदा आणि सुरक्षा बाबत गृहविभागाने पुन्हा आपलं पोलीस डिपार्टमेंट कसं चालतं हे पाहिलं पाहिजे, असा टोलाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर झालेला हा प्रकार आहे. त्यांनी त्यावेळीच हस्तक्षेप करायला हवा होता. पोलीस अधिकारी खेटून आहेत. सुरक्ष रक्षकही आहेत. अशावेळी महिलेला, गर्दीत कशाला बाजूला व्हा असं सांगणं हे विनयभंगात कसं बसतं? विनयभंगात अशा गोष्टी बसवून एखाद्याला अडकवत असू तर हा कायद्याचा चुकीचा प्रकार आहे, असंही ते म्हणाले.