भाजपनेच पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली; जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोप
मशाल चिन्हावर समता पार्टीने घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मशाल चिन्हावर घेण्यात आलेल्या आक्षेपाबाबत मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.
भूषण पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी शिवसेना फुटीवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप सत्तेविना राहू शकत नाही. म्हणून पडेल ती किंमत देऊन भाजपने शिवसेना फोडली आहे. शिवसेना (shivsena) फोडल्यानंतर कोणावर तरी खापर फोडायचे म्हणून राष्ट्रवादीचं (ncp) नाव घेतलं जात आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. जयंत पाटील आज कोल्हापुरात आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी माझं नेहमी स्वागतच केलंय.प्रोफेशनली आपल्याला टिकायचं असेल तर पुढचा पक्ष प्रोफेशनली फोडला पाहिजे म्हणून राष्ट्रवादीच नावं घेतलं जातंय. उद्धव ठाकरे यांच्या घरातली शिवसेना चोरीला गेली. आता ती कुणाच्या घरात सापडेल हे थोड्या दिवसात कळेल. शिवसेना फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच त्यांनी पक्ष फोडला, असं जयंत पाटील म्हणाले.
शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती. ती भाजपप्रणित होती. शिवसेना फोडण्यात भाजपचा आहे हे यातून स्पष्ट होतं. बाळासाहेबांचं नाव शिंदे यांना मिळालं यावरूनच किती मॅन्यूप्युलेटेडपणे काम चाललंय हे दिसतं, असंही ते म्हणाले.
ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम दाम दंड भेद वापरून फोडणे योग्य आहे का? या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जनमताची छोटीशी चाचणी होणार आहे. उमेदवार पळवायचे काम हे करत असतील तर जनता हे पाहत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मशाल चिन्हावर समता पार्टीने घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मशाल चिन्हावर घेण्यात आलेल्या आक्षेपाबाबत मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.
लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे. रस्ते, वीज, पाणी नैसर्गिक संसाधने कमी पडू लागली आहेत. सर्वांचे एकमत करून यावर निर्णय घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही. मात्र शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना जन्म दिला आहे. त्यामुळे शिंदेंवर शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेनेला अशा भावना व्यक्त करायला परवानगी दिली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.