जयंत पाटील अजितदादांसोबत सत्तेत सहभागी होणार? गुप्त बैठकीत नेमक काय घडलं ?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये ही गुप्त बैठक झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे.
पुणे | अजित पवार आणि शरद पवार ( Ajit Pawar – Sharad Pawar ) यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. आज दुपारी कोरेगाव पार्कमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. या भेटीदरम्यान जयंत पाटील देखील उपस्थित होते. या सोबत आणखी २ आमदार देखील उपस्थित होते. जवळपास अर्धातास ही बैठक झाल्याचं कळतं आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतं आहे. अजित पवार यांच्यासोबत जवळपास ३५ आमदार तर शरद पवार यांच्याकडे जवळपास १३ आमदार आहेत. पक्षफुटीनंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जयंत पवार हे देखील अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता जयंत पाटील ( Jayant Patil ) हे भाजपसोबत सत्तेत जाण्याची शक्यता वाढली आहे.
पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जर अजित पवार यांच्यासोबत गेले तर मग मुळ पक्षच हा अजित पवार यांच्याकडे जाईल. जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेले तर त्यांना मोठं मंत्रीपद देखील मिळू शकते. पण आता शरद पवार यांची भूमिका काय होती. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
जयंत पाटील हे शरद पवार यांच्या सहमतीशिवाय भाजपसोबत जाणार नाहीत. त्यामुळे शरद पवार यांना माहिती दिल्यानंतरच जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जातील अशी सूत्रांची माहिती आहे.
पुण्यात या गुप्त बैठकीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे आता काही वेगळा निर्णय घेणार का याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. महाविकासआघाडीत यामुळे काही पडसाद उमटतात का हे देखील पाहावं लागेल.