जयदत्त क्षीरसागर…. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद

| Updated on: Jun 16, 2019 | 12:17 PM

जयदत्त क्षीरसागर यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला.

जयदत्त क्षीरसागर.... महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद
Follow us on

मुंबई : अवघ्या महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नेमके कोणते खाते दिले जाईल, हे आज किंवा येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.

राष्ट्रवादी सोडण्याचे कारण काय?

जयदत्त क्षीरसागर यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. “राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याला अनेक कारणे आहेत. पक्ष वाढवण्यासाठी निष्ठेने, ताकदीने मेहनत घेतली. जिल्ह्यात सहा आमदार आहेत, त्यापैकी 5 आमदार निवडून आणले. गेल्या काही वर्षांपासून पक्षात कोंडी, घुसमट, अवमूल्यन होणं हे सातत्याने घडत गेले. आम्ही संयमाने वाट पाहिली की यात काही दुरुस्ती होईल, सुधारणा होईल. पण दुर्दैवाने त्या गोष्टी झाल्या नाहीत आणि शेवटी कार्यकर्त्यांचा संयम किती काळापर्यंत टिकेल हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता भुमीका स्पष्ट करा आणि हि भूमिका मला घ्यावी लागली.”, असे कारण जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे असल्याचे सांगितले होते.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

जयदत्त क्षीरसागर हे बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच शिवसेनेत प्रवेश
  • बीडच्या केशरकाकू क्षीरसागरांचे पुत्र
  • 2009 मध्ये प्रथम विधानसभेवर निवडून गेले
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री
  • 2014 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवड
  • विधानसभेतील राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते
  • मराठवाड्यात ओबीसीचे राजकारण
  • मुंडे घराण्याशी सलोख्याचा संबंध
  • तौलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यानं मोदींशी संवाद
  • क्षीरसागर कुटुंब उच्चशिक्षित म्हणून प्रसिद्ध

संबंधित बातम्या :

बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान : अजित पवार

जयदत्त क्षीरसागर यांनी ‘राष्ट्रवादी’ सोडण्याचं कारण सांगितलं!

निकालाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीत भूकंप, जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

शरद पवार जयदत्त क्षीरसागर यांच्या गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार