राष्ट्रवादीला मोठा धक्का, जयदत्त क्षीरसागरांचा भाजपला जाहीर पाठिंबा
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. हजारो कार्यकर्त्यांसोबत बैठक केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प केला. शिवाय बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना साथ देण्याचं आवाहन हजारो कार्यकर्त्यांना केलं. 18 तारखेला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. हजारो कार्यकर्त्यांसोबत बैठक केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प केला. शिवाय बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना साथ देण्याचं आवाहन हजारो कार्यकर्त्यांना केलं. 18 तारखेला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. विशेष म्हणजे 18 एप्रिल रोजी बीड लोकसभेसाठी मतदान आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली. 35 वर्षांचं नातं घट्ट राहू द्या, असं म्हणत जयदत्त क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या एका शब्दामुळे मी जयसिंगराव गायकवाड यांना निवडून आणलं. पण सध्या राष्ट्रवादीत काय सुरू आहे माहीत नाही. पक्ष कोण चालवतोय माहीत नाही. मला पक्षाने मजबूर केलंय. पण मी मजबूर नाही, तर मजबूत आहे, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
राष्ट्रवादीत सध्या आऊटगोईंग सुरू आहे. मी खूप संयमी आहे. मी काहीही बोलत नाही. पण माझा सयंम हा कमकुवत नाही, तर स्वभाव आहे. सयमांच्या सीमेचा बांध तुटायला लागला आहे. माझं घोडं तुमच्याकडे अडकलं नव्हतं. माझं मन खच खाल्लं होतं. मी कधीही जातीवाद केला नाही, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी सध्याच्या राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली.
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या
बीडमध्ये राष्ट्रवादीवर सध्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचं एकहाती वर्चस्व असल्याचं चित्र आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीविरोधात काम केलं. त्यांचा रोष धनंजय मुंडेंवर होता. यामुळे राष्ट्रवादीला जिल्हा परिषद गमवावी लागली. आता लोकसभेच्या तोंडावर धनंजय मुंडेंना आणखी एक धक्का बसलाय. कारण, बीडची जागा धनंजय मुंडेंनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यांचे विश्वासू बजरंग सोनवणेंना त्यांनी निवडणुकीत उतरवलंय. पण बीडमधील पक्षाच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यानेच भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याचं जाहीर आवाहन केलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंची अडचण आणखी वाढली आहे. यापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंना धक्का बसला होता.
कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?
बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे ते चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्री मंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट सुरू असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.
क्षीरसागर कुटुंबात वाद
काका-पुतणे यांचा वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. ठाकरे घरात पहिली ठिणगी पेटल्यानंतर हा प्रकार दिग्गज नेत्यांच्या घरी सुरु राहिला. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांचं घर फुटलं. त्यानंतर जिल्ह्यात मोठा दुसरा धक्का तो म्हणजे क्षीरसागर घराण्याला बसला. पुतणे संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यावरून घरात वाद पेटला तो अद्याप शमलाच नाही. नाराज पुतणे संदीप क्षीरसागर यांची नाराजी वाढतच गेली आणि काकू नाना आघाडी स्थापन करून खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. पुतण्याला जिल्ह्यातील पक्षातील काही नेत्यांकडूनच जाणिवपूर्वक बळ दिलं जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत.