Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांकडून अभिनेता अक्षय कुमारचा ‘मूर्ख माणूस’ असा उल्लेख! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवरही टीकास्त्र
पृथ्वीराज चौहान कोण होता हे तुम्हाला माहिती नसेल तर गुगल करा. 26 वर्षीय पृथ्वीराज चौहान घोड्यावर बसला, अक्षय कुमार 50 चा आहे, अशा शब्दात आव्हाडांनी अक्षय कुमारवर (Akshay Kumar) निशाणा साधलाय. इतकंच नाही तर आव्हाडांनी अक्षय कुमारचा उल्लेख मुर्ख माणूस असाही केलाय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर जोरदार टीका केलीय. अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमावतो. पृथ्वीराज चौहान सगळ्यांना माहिती आहेत, लिहिलेले आहे इतिहासात. पृथ्वीराज चौहान कोण होता हे तुम्हाला माहिती नसेल तर गुगल करा. 26 वर्षीय पृथ्वीराज चौहान घोड्यावर बसला, अक्षय कुमार 50 चा आहे, अशा शब्दात आव्हाडांनी अक्षय कुमारवर (Akshay Kumar) निशाणा साधलाय. इतकंच नाही तर आव्हाडांनी अक्षय कुमारचा उल्लेख मुर्ख माणूस असाही केलाय. अक्षय कुमारचा नवा सम्राट पृथ्वीराज या नवा सिनेमा येत आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये तो सध्या व्यस्त आहे. अशावेळी आव्हाड यांनी अक्षयकुमारवर जोरदार टीका केलीय. त्याचबरोबर आव्हाड यांनी शिवशाहीर स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावरही जोरदार टीका केलीय.
‘तुकोबारायांची गाथा बुडवली नव्हती, तर जाळली होती’
आव्हाड पुढे म्हणाले की, आता लोकशाही आहे. सगळे राजे बिजे घरी गेलेत. तुकोबारायांचं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. तुकोबारायांची गाथा बुडवली नव्हती, तर ती गायब केली होती, जाळली होती, असा दावाही आव्हाडांनी केलाय. तसंच मी बोललो तर हेडलाईन होते, असंही आव्हाड म्हणालेत.
बाबासाहेब पुरंदरेंवर आव्हाडांचा गंभीर आरोप
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करताना आव्हाड म्हणाले की, माणूस मेल्यानंतर सगळं काही संपतं. तो गेल्यानंतर जेम्स लेन जागा होतो. एक इतिहासकार बदनाम करुन गेला. 20 वर्षे कुणी बोलत नाही. तो अमेरिकेतून मुलाखत देतो. ही माहिती त्याला कुणी दिली. ती जी माहिती आहे ती पुरंदरेंनीच पुस्तकात लिहून ठेवलीय. हे मी जाहीरपणे बोलतोय. जमिनी वाचवण्यासाठी मराठे आईला पाठवायचे हे पुरंदरेंनी लिहिलं आहे. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम वाद याच शिवचरित्रानं केला, असा खळबळजनक दावाही आव्हाड यांनी केलाय.
इंधन दरवाढीवरुन आव्हाडांचा अक्षय कुमारला टोला
यापूर्वी 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन अक्षय कुमारवर टीका केली होती. आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून अक्षय कुमारला लक्ष्य केलं होतं. 2011 साली मनमोहन सिंग यांचं सरकार असताना इंधन दरवाढीवरुन अक्षय कुमारनं एक ट्विट केलं होतं. ‘पेट्रोल महागण्याआधी मुंबईकरांनी पेट्रोल पंपावर लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात अडकल्यानं मला रात्री घरी देखील जाता आलं नाही’, असं अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. आव्हाड यांनी त्याच ट्वीटचा धागा पकडत अक्षय कुमारला खोचक सवाल केला होता. ‘अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का? तू कार वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत’, असा टोला आव्हाड यांनी अक्षय कुमारला लगावला होता.