माझ्या खुनाचं प्लानिंग झालं असतं तरी चाललं असतं, पण…; जितेंद्र आव्हाडांचा कंठ दाटला, डोळे भरून आले
यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. मी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिला आहे. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण होऊ नये. नाही तर अशाने घरं उद्धवस्त होतील, असं ते म्हणाले.
ठाणे: विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे अत्यंत व्यथित झाले आहेत. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आपल्यावर झालेल्या आरोपावर भूमिका मांडताना आव्हाड यांचा कंठ दाटून आला. त्यांचे डोळे भरून आले. माझ्या खुनाचा प्लानिंग झाला असता. माझ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असता तरी एकवेळ चाललं असतं. पण विनयभंगाचा गुन्हा?… 354 कलम? हे अत्यंत वाईट आहे. या कलमासाठी जन्माला आलोय का? असा उद्विग्न सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे डोळे भरून आले आणि कंठ दाटला होता. मी गेली 35 वर्ष शरद पवार यांच्यासोबत फिरत आहे. राजकारणात अनेक चढउतार पाहिले. पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही. असंच जर होत असेल तर त्यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
एकवेळ माझ्यावर खुनाचा गुन्हा चालेल. पण विनयभंगाचा गुन्हा चालणार नाही. माझ्यावरचा गुन्हा हा षडयंत्राचा भाग आहे. कोणत्याही कायद्याचं पालन न करता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं ते म्हणाले.
मला ते कलम लावण्यात आल्याने वाईट वाटतं. माझ्या खुनाचं प्लानिंग झालं असतं तर वाईट वाटलं नसतं. ते माझ्यासाठी गौण आहे. पण 354 कलम काळजाला लागलं आहे. 376 आणि 354 साठी मी जन्माला आलो नाही, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. मी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिला आहे. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण होऊ नये. नाही तर अशाने घरं उद्धवस्त होतील, असं ते म्हणाले.
हा कुणाचा प्लानिंग आहे की नाही मला माहीत नाही. त्यात मला जायचं नाही. पण असं कलम लावणं हे चुकीचंच आहे, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुलाचं उद्घाटन करण्यासाठी येणार होते. हे पुलाचं काम माझ्यामुळे मार्गी लागलं. त्याचं मीही उद्घाटन करू शकलो असतो. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. पण मुख्यमंत्री ठाण्यातील आहेत. पहिल्यांदाच त्यांच्या हस्ते ठाण्यातील प्रकल्पाचं लोकार्पण होणार होतं. त्यामुळे मला राजकारण करायचं नव्हतं. त्यांचा सन्मान राखायचा होता. हे मी कालच स्पष्ट केलं होतं, असंही ते म्हणाले.