…तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
अंबरनाथमधील माजी नगरसेवक कबीर गायकवाड, भाजपचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील आणि राष्ट्रवादीचे पूर्वीचे पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).
ठाणे : “अंबरनाथ महापालिका निवडणूक शिवसेना आणि काँग्रेस पक्षासोबत लढण्याला प्राधान्य असेल. मात्र, स्वबळावर लढण्याची वेळ आली तर त्याचीदेखील आमची तयारी आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (31 ऑक्टोबर) अंबरनाथमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी सभागृहात हा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते.
“आगामी अंबरनाथ पालिका निवडणूक ही शिवसेनेला मोठा भाऊ मानून आणि काँग्रेसला सोबत घेऊन एकत्र लढण्याची आमची तयारी आहे. पण तसं झालं नाही तर स्वबळावर लढण्याचीदेखील आमची तयारी आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).
या मेळाव्यात अंबरनाथमधील माजी नगरसेवक कबीर गायकवाड, भाजपचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील आणि राष्ट्रवादीचे पूर्वीचे पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या कामांचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये एकहाती टिकवण्याचं काम सदाशिव पाटील यांनी केलं आहे, असं आव्हाड म्हणाले.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज झालेल्या या प्रवेशामुळे शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी काळात शहरात 12 ते 15 जागा निवडून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे”, असं सदाशिव पाटील यावेळी म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे यावेळी कबीर गायकवाड आणि कृष्णा रसाळ पाटील यांनी सांगितलं.