‘बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नव्हतं’ म्हणणाऱ्या नितीन गडकरींना जितेंद्र आव्हाडांचं उत्तर
तुमच्या पिढ्यानपिढ्या हजारो वर्षे शिकत होत्या, तेव्हा आमचे पूर्वज मैला वाहत होते किंवा रस्त्याच्या कडेला ढोरं धूत होते, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, असं म्हणणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर (Jitendra Awhad on Nitin Gadkari) दिलं आहे. तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होतं तेव्हा आम्ही गावकुसाबाहेर होतो, अशा शब्दात आव्हाडांनी खेद व्यक्त केला आहे.
‘साहेब, तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होतं तेव्हा आम्ही शाळेच्याच नाही, तर गावकुसाच्या सुद्धा बाहेर होतो. तुमच्या पिढ्यानपिढ्या हजारो वर्षे शिकत होत्या, तेव्हा आमचे पूर्वज मैला वाहत होते किंवा रस्त्याच्या कडेला ढोरं धूत होते.’ असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. “आरक्षणाने प्रगती होत नाही” या नितीन गडकरींच्या वाक्याचा संदर्भ देऊन आव्हाडांनी आपलं मत मांडलं आहे.
“आरक्षणाने प्रगती होत नाही” – नितीन गडकरी
साहेब, तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होतं तेव्हा आम्ही शाळेच्याच नाही, तर गावकुसाच्या सुद्धा बाहेर होतो. तुमच्या पिढ्यानपिढ्या हजारो वर्षे शिकत होत्या, तेव्हा आमचे पूर्वज मैला वाहत होते किंवा रस्त्याच्या कडेला ढोरं धूत होते.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 17, 2019
“बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं, मला नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हायचं आहे, असं नितीन गडकरी नागपुरात अखिल माळी समाज महाधिवेशनाच्या कार्यक्रमात म्हणाले होते. त्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता जितेंद्र आव्हाडांनीही नाराजी (Jitendra Awhad on Nitin Gadkari) व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते गडकरी?
“मी सगळ्याच समाजाच्या कार्यक्रमात जातो, प्रत्येक समाजात मागणी असते आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे, मंत्रिपद समाजाला मिळालं पाहिजे. पण मी थोडं स्पष्ट बोलतो आणि सांगतो की विशिष्ट समाजातला माणूस मंत्री झाला की त्याच्या हातून त्याच समाजाचा विकास होईल असं नाही त्याला सगळ्याच समाजाचा विचार करावा लागतो.” असं गडकरी म्हणाले होते.
माळी समाजातील अनेक लोक चांगले शिक्षित आहेत. शिक्षणाचा उपयोग समाज विकासासाठी व्हावा. आता सगळ्याच समाजाने रुढी परंपरेच्या बाहेर येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली होती.
प्रत्येक समाजाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. अनेक समाजात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पण त्यांचा विकास झाला नाही. तो करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्न केल्यास कुठलंच कार्य अशक्य नाही त्यासाठी समाजातील जागरुकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं गडकरींनी नमूद केलं होतं.
बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी…. : नितीन गडकरी
मी ग्रामीण भागातील 15 हजार युवकांना रोजगार दिला, त्यात माझ्या समाजाचे 50 सुद्धा नाहीत. मी जाती- धर्म मानत नाही. प्रत्येकासाठी काम करतो, असंही नितीन गडकरींनी सांगितलं होतं.
जे लोक कर्तृत्वाने हरतात ते तिकीट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात. आरक्षण मिळाल्याने सगळा विकास होतो असं नाही. कर्तृत्व सुद्धा विकास घडवते. म्हणून आपण करतो त्या कामाला सुद्धा महत्व दिलं पाहिजे, असं गडकरींनी ठणकावून सांगितलं होतं.
आम्ही असे नेते तयार केले पाहिजेत, जे देशाला विकासाच्या कक्षेत आणतील, राज्याच्या विकासासाठी काम करतील. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची माळी समाजाची मागणी आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार, असं आश्वासन गडकरींनी यावेळी दिलं होतं.