कुत्ता अन् कुर्लामध्ये झाला घोळ अन् महाराष्ट्रातील राजकारण तापले
salim kutta and sudhakar badgujar | आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत आरोप केले. या आरोपानंतर खळबळ माजली. सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टीत सहभागी झाल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. परंतु काँग्रेस आमदाराने सलीम कुत्ता १९९८ मध्येच मेल्याचे म्हटले अन् घोळ सुरु झाला.
कृष्णा सोनारवाडकर, मुंबई, दि.18 डिसेंबर | आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याबाबत गंभीर आरोप केले. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाशिक शिवसेना ठाकरे गटाचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने पार्टी केली. परंतु त्यानंतर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी सलीम कुत्ता याची १९९८ मध्ये हत्या झाल्याचा दावा केला. यामुळे सुधाकर बडगुजरसोबत असणारा सलीम कुत्ता कोण? हा प्रश्न निर्माण झाला होता. आता त्यावर स्पष्टीकरण आले आहे. कैलास गोरंट्याल यांनी दावा केलेल्या आरोपीचे नाव सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला असल्याची माहिती समोर आली आहे. कुत्ता अन् कुर्लामधील या घोळामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले होते.
आमदार कैलास गोरंट्याल यांचा घोळ
सलीम कुर्ला याची १९९८ साली विरोधी गँगकडून हत्या झाल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले. परंतु आमदार गोरंट्याल यांचा सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला या दोन नावात गोंधळ झाला. त्यांनी चुकीची माहिती माध्यमांना दिली. सलीम कुत्ता सध्या येरवडा कारागृहातच आहे. तर १९९८ साली मारल्या गेलेल्या सलीम कुर्लावर १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप होता. खटला सुरु असतानाच सलीम कुर्लाचा मृत्यू झाला.
मलमत्ता कुटुंबियांना दिली परत
सलीम कुर्लाचा मृत्यू झाल्यामुळे त्याची सीबीआयने जप्त केलेली मालमत्ता कोर्टाने रिलीज केली होती. सलीम कुर्लाची पत्नी रिझवाना खानने यासंदर्भात पाठपुरावा केला होता. ज्यामध्ये जोगेश्वरीतील बेहरामपाडामधील एक फ्लॅट, एक स्कूटर आणि इतर मालमत्ता कोर्टाने रिलीज केली होती. सुधाकर बडगुजर यांच्यासोबत व्हिडिओत दिसणारा आरोपी सलीम कुत्ता हाच आहे.
संजय राऊत यांच्यापर्यंत कुत्ताचे धागेदोरे
सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत आहे, असा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी होईल आणि संजय राऊत लवकरच डिसेंबरच्या अंती किंवा जानेवारी महिन्यामध्ये तुरुंगात दिसतील, असे त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. सलीम कुत्ताचे प्रकरण ज्या पद्धतीने समोर आले आहे, सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय यामुळे या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळणार आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.