कंगनाचा संसदेतील पहिल्याच भाषणात सिक्सर, असं काय म्हणाली की ज्यामुळे गोंधळ झाला?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानते. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात हिमाचल प्रदेशासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व हिमाचल प्रदेशातील लोक निर्मला सीतारामन यांचं आभार मानतो. गेल्या दहा वर्षात भाजपने हिमाचल प्रदेशात जेवढं काम केलंय, तेवढं काम गेल्या साठ वर्षात हिमाचलमध्ये झालं नाही, असं कंगना रणौत यांनी सांगितलं.
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी आज संसदेत पहिलंच भाषण केलं. पहिल्याच भाषणात कंगनाने भल्याभल्यांना धोबीपछाड केलं आहे. अर्थसंकल्प 2024 वर बोलताना कंगनाने तिची भूमिका मांडली. यावेळी तिने काँग्रेसवर जोरदार टीका केली. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं तोंडभरून कौतुक केलं. यावेळी कंगनाने हिमाचल प्रदेशाला पॅकेज दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारही व्यक्त केले.
माझ्यासाठी ही जागा अत्यंत नवीन आहे. मी नवीन खासदार आहे. 18 लोकसभा ही काही सामान्य लोकसभा नाही, याचं मला पूर्ण भान आहे. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन गेल्या साठ वर्षातील विक्रमही मोडला आहे, असं कंगनाने म्हटलं.
मोदींचे अभिनंदन करते…
आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. या सभागृहात बसण्याचं ज्यांना सौभाग्य मिळालं अशा भाजपच्या सर्व खासदारांचंही अभिनंदन करते. देशातील जनतेनेही एक सक्षम सरकार केंद्रात बसवलं त्याबद्दल जनतेचेही विशेष आभार मानते, असं म्हणत कंगनाने आर्थिक मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा कंगनाने काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली, तेव्हा लोकसभेत थोडावेळ गोंधळ झाला. तिच्या भाषणात व्यत्यय येऊ लागला. पण कंगना आपलं म्हणणं रेटत होती. काँग्रेसच्या काळात हिमाचल प्रदेशाचा विकास झाला नसल्याचा दावा तिने यावेळी केला.
आज तिसऱ्या नंबरकडे जातोय
10 वर्षापूर्वी आपल्या अर्थव्यवस्थेची अवस्था काय होती हे आपण सर्व जाणतो आहोत. दहा वर्षापूर्वी आपली अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. ही अर्थव्यवस्था 11 व्या किंवा 12व्या नंबरवर होती. संपूर्ण देशाला अर्थव्यवस्थेची चिंता लागून राहिली होती. आता तीच अर्थव्यवस्था 11 व्या नंबरवरून 5 व्या नंबरवर आली आहे. आता आपण वेगाने तिसऱ्या नंबरकडे जात आहोत. केंद्र सरकारने सादर केलेला बजेट सर्व वर्गांना शक्ती देणारा आहे. या अर्थसंकल्पातून आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. या अर्थसंकल्पामुळे आपण 2047च्या आपल्या विकसीत भारताच्या संकल्पाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहोत, असं कंगना म्हणाल्या. यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशात मागच्यावेळी आलेल्या नैसर्गिक संकटाचाही उल्लेख केला.
काँग्रेसवर टीका
2023मध्ये हिमाचल प्रदेशात भीषण महापूर आला होता. त्यामुळे धनधान्यासह माणसंही गमवावी लागली होती. आज एक वर्षानंतरही हिमाचल प्रदेश त्या संकटातून बाहेर आलेला नाही. काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि चुकीची धोरणं यामुळे हिमाचल प्रदेश या संकटातून अजून बाहेर आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.