Kirit Somaiya : हातोडा अन् फावडं घेऊन सोमय्या पोहोचले दापोलीत, साई रिसॉर्ट अनधिकृत, मुख्यमंत्र्यांनी फाईल मागवली-किरीट सोमय्या
'एखाद्या लहान व्यक्तीनं काही अनधिकृत बांधकाम केलं तर त्यावर हातोडा मारला जातो. अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये एक दिवस राहण्याचं भाडं 35 हजार इतकं आहे. 100 कोटींची ती मालमत्ता आहे.'
रत्नागिरी : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीमधील (Dapoli) मुरुड याठिकाणी असलेल्या साई रिसॉर्टच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल परबांवर (Anil Parab) साई रिसॉर्टप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं देखील त्यांनी यापूर्वी म्हटलं आहे. आज भाजप नेते किरीट सोमय्या खेड रेल्वे स्थानकातून दापोलीला पोहोचले. खेड ते दापोलीला जात असताना सोमय्या यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. हातोडा, कुदळ आणि फावडा यांच्या प्रतिकात्मक प्रतिकृती घेऊन दापोलीला सोमय्या पोहोचले आहेत. साई रिसॉर्टप्रकरणी सोमय्या आक्रमक झाले असून हे रिसॉर्ट इतिहास जमा होणार असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलंय. त्यामुळे आता हा वाद अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
सोमय्या नेमकं काय म्हणालेत?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ”एखाद्या लहान व्यक्तीनं काही अनधिकृत बांधकाम केलं तर त्यावर हातोडा मारला जातो. अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये एक दिवस राहण्याचं भाडं 35 हजार इतकं आहे. 100 कोटींची ती मालमत्ता आहे. केंद्र सरकारची टीम आली आणि हे अनधिकृत आहे, हे सिद्ध केलंय. ही जागा विभा साठेंकडून घेतली आणि सदा परब यांनी हा रिसॉर्टनंतर अनिल परब यांच्याकडून विकत घेतला,’ असा आरोपही त्यांनी केलाय.
‘माझा घातपात करण्याचं…’
यावेळी किरीट सोमय्या यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री कोविडच्या काळात भ्रष्टाचार करत होते. गेल्या वेळेस इथे आलो होतो तेव्हा माझा घातपात करण्याचे काम केले जात होते आणि इथच्या पोलिसांनी मला गेल्या वेळेस अटक केली. दापोली पोलिसांना अनिल परब यांच्यावरील FIR घ्यावाचं लागणार. मुख्यमंत्र्यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टसंदर्भात फाईल मागवली आहे. तो रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले आहे,’ असंही यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या म्हणालेत.
पर्यावरण खात्याकडूनही पाहणी
अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. साई रिसॉर्टनं सीआरझेडचा उल्लंघन केल्याचा आरोप ही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर पर्यावरण खात्याची पाच जणांची टीमने या रिसॉर्टची पाहणी केली. यात न्नईमध्ये पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारीही होते. आतापर्यंत याप्रकरणी काय कारवाई झाली? तसेच पर्यावरणाच्या हानीची या टीमकडून चौकशी करण्यात आली होती.