मुंबई: रवी राणा (ravi rana) माझा कधीही भाऊ नव्हता. किरीट (kirit somaiya) भाव आहे. अजूनही आहे. आणि त्यांचं काम ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे चोख बजावतात. त्यामुळे ठिक आहे. किरीट भाव आहे. पण हे बाकीचे पक्ष बंधू… आपण म्हणतो ना गुरु बंधू, मानलेला भाऊ तसे हे भाऊ आहेत. सर्वांना अभिष्टचिंतन तर करतेच. पण त्याबरोबर मती जाग्यावर ठेवून मातीसाठी काही करा. माती खाऊ नका अशी आशाही करते, असं ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
माझं लग्न झालं तेव्हा सख्खे चुलत भाऊ कोणी आलं नाही. कारण आमचा प्रेम विवाह होता. तेव्हा आम्ही बैठ्या चाळीत राहत होतो. तिथे हनुमंताचं मंदिर आहे. लग्नानंतरची पहिली रक्षा बंधन आली. तेव्हा मी हनुमानाला राखी बांधली. त्यानंतर भाऊबीज आली तेव्हा हनुमानाला ओवाळलं. कायम माझा तो पाठिराखा आहे. मी लोकांसारखा दांभिकपणा करत नाही. लोकांसारखं हनुमान चालिसा पठण करत नाही. मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्याला नाव न घेता लगावला.
हनुमंत चिरंजीवी आहे. मी बहीण म्हणून तुझा भाऊ म्हणून स्वीकार केलाय. तू बहीण म्हणून माझाही स्वीकार कर आणि मला प्रत्येक आनंदात आणि संकटात तुझं स्मरण राहू दे अशी प्रार्थना करते. आजही केलं. हनुमानाला राखी बांधली किंवा वस्त्र चढवलं तर कुठेही कमी पडत नाही. उलट अधिकाधिक प्रगती होते. त्या हनुमंताची कृपा आहे. महापौर असताना जे आले त्यांची भाऊबीज केली. पण हनुमंतांचीही केली, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेतून फुटून गेलेल्या त्या 40 जणांना शुभेच्छा आहे. आपल्याकडे अख्यायिका आहे. यमुना आणि यम हे सख्खे भाऊ बहीण आहेत. यमुना भावाला बोलवत होती. पण यम जात नव्हता. ज्या दिवशी यम गेला. त्या दिवशी त्यांना औक्षण केलं. टिळा लावला. ओवाळलं. तेव्हापासून भाऊबीजेचं नातं दृढ झालं अशी अख्यायिका आहे. नक्कीच जे काही चाळीस बेचाळीस आहेत. त्यांना दीर्घायुष्य मिळावं, असं त्या म्हणाल्या.
पण त्या 40 आमदारांना शुभेच्छा देताना एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू आहे. आसू यासाठी की त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. आमचा विश्वास घात केला. हसू यासाठी की बरेच वर्ष पाचर अडकून होती. कुठेही तुम्हीच होता. प्रत्येक पदावर तुम्ही होता. आता राजकारणात तरुणांना वाव मिळेल. तरुण आणि नीट विचाराचा वर्ग राजकारणात येईल. जनतेसाठी काही तरी करणारे तरुण येतील. त्यांना राजकीय क्षेत्रात चमक दाखवण्याची संधी मिळेल, असं त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते सत्तेत आहेत. त्यांचे दौरे राजकीय का बघता? त्यांनी दौऱ्यावर जायलाच हवे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना होता. उद्धव ठाकरेंनी त्या काळात महाराष्ट्र सांभाळला. म्हणून आपण आज सण दणक्यात साजरे करत आहोत. ते जात आहेत. तर जाऊ द्या. ते सरकारमध्ये आहेत. त्यात काय एवढं ढोल वाजवायचे. सरकार म्हणून जात असतील तर पक्षही वाढवा, असा चिमटाही त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकांवरूनही शिंदे सरकारला टोला लगावला. पण निवडणूक कधी होणार हे विचारलं तर एक सांगतो कोर्ट आणि देव ठरवेल. दुसरा म्हणतो, जानेवारीत होईल. म्हणजे हे दोन देव जे आज महाराष्ट्रावर बसलेत ते ठरवणार आहेत. अर्थात तुम्ही कधीही निवडणूक घ्या. लोकशाही बळकट आहे. ते तुम्हाला दिसून येणार, असा दावा त्यांनी केला.