मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे. (Kirit Somaiya’s challenge to CM Uddhav Thackeray and Sharad Pawar)
सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मी कोल्हापुरला अंबेमातेच्या दर्शनासाठी जात आहे. कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू शक्तीची माता आहे. तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता. अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करणार की भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे. त्यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला मागच्या वेळी पोलिसांनी कुठली नोटीस दिली आहे का? त्यावर सोमय्या म्हणाले की आता मी त्यांना नोटीस दिली आहे. मी शरद पवारांना नोटीस दिली, मी उद्धव ठाकरेंना नोटीस दिली. मी कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांना सांगितंल, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की, तुमच्यात हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा. आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.
ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही सोमय्या यांनी जोरदार हल्ला चढवलाय. हसन मुश्रीफ मला या ना त्या प्रकारे थांबवण्याचा पयत्न करणार. उद्या मुश्रीफ यांच्या तिसऱ्या आणि चौथ्या घोटाळ्याचीही तक्रार करणार, असा इशाराच सोमय्या यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून यांनी केवळ लुटा हेच शिकलं आहे. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान देतो की हिम्मत असेल तर मला थांबवा. पोलिसांचा गुंडांसारखा वापर केला. आता ते थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना तुरुंगात जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाहीत. हसन मुश्रीफ यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केलाय.
सामनाच्या रोखठोक सदरातून विरोधकांची हास्यजत्रा या मथळ्यातून संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला होता. त्यावर ‘हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं होतं. जर किरीट सोमय्याची हास्य जत्रा आहे किंवा विरोधी पक्षातच जोर नाही, मग सामनामधून किरीट सोमय्याची दखल का घेता? असा सवालही त्यांनी केला होता.
इतर बातम्या :
सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र, अडसूळांवरील कारवाईवरुन वडेट्टीवारांचा घणाघात
मलिक अंबरने जेवढा पाणीप्रश्न सोडवला, तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याला जमला नाही : जितेंद्र आव्हाड
Kirit Somaiya’s challenge to CM Uddhav Thackeray and Sharad Pawar