मतदारांच्या ‘कार्यसम्राट आमदार’; वाचा, कसा आहे मोनिका राजळेंचा राजकीय प्रवास!
शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे या अतिशय शांत आणि मनमिळावू राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका केली नाही. (Monika Rajale)
मुंबई: शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे या अतिशय शांत आणि मनमिळावू राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका केली नाही. मतदारसंघातील विकास कामांवर त्यांनी जोर दिल्याने त्यांना कार्यसम्राट आमदार ही पदवीच मतदारांनी बहाल केली आहे. पतीच्या निधनानंतरही खचून न जाता जनसेवेचं काम पुढे नेटणाऱ्या मोनिका राजळेंच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. (know about bjp’s popular mla Monika Rajale)
घरीच राजकारणाचा वारसा
मोनिका राजळे यांच्या सासरीच राजकारणाचा वारसा होता. त्यांचे पती दिवंगत राजीव राजळे हे माजी आमदार होते. तर त्यांचे सासरे अप्पासाहेब राजळे सुद्धा माजी आमदार होते. त्यामुळे घरातच राजकीय वारसा त्यांना मिळालाहोता. विशेष म्हणजे तालुक्याच्या पहिल्या आमदार होण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो. त्यामुळेच त्या सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून येऊ शकल्या आहेत. त्यांना कृष्णा आणि कबीर ही दोन मुले आहेत. कृष्णा उच्च शिक्षण घेत आहे.
अन् तिकीट मिळालं
2014मध्ये विधानसभेची निवडणूक सुरू होण्याआधीच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं. त्यावेळी भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या सहानभूतीमुळे मोनिका राजळे विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019ची विधानसभा निवडणूक त्रिशंकू होऊनही राजळे यांनी दणदणीत मतांनी विजय मिळविला होता. अगदी भाजपमध्ये दोन गट असतानाही त्यांनी विजय मिळविला होता.
“राजळे हटाव, भाजप बचाव”
दरम्यान, 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वपक्षीयांकडूनच मोठा विरोध सहन करावा लागला होता. “राजळे हटाव, भाजप बचाव” या घोषणांसह राजळे विरोधी मोहिमेला स्थानिक भाजपमध्ये वेग आला होता. विशेष म्हणजे राजळेंना विरोध करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील पार पडला होता. यावेळी पंकजा मुंडे समर्थक (Supporter of Pankaja Munde) देखील राजळेंच्या विरोधात उतरले होते. मागील 5 वर्षात अनेक ठिकाणी डावलून अपमानास्पद वागणूक दिली. त्याला वाचा फोडण्यासाठीच सर्व मूळ भाजप आणि मित्र पक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचं मत संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं होतं. विशेष म्हणजे भाजप युवामोर्चाचे आणि पंकजा मुंडे समर्थक अमोल गर्जे, जिल्हापरिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते. मात्र, या सर्वांवर मात करून राजळे उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरल्या होत्या.
पतीच्या निधनानंतर खचल्या नाही
मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे यांनी राष्ट्रवादीकडून नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. राजळे हे उच्च शिक्षित आणि अभ्यासू आमदार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच तरुणांमध्ये लोकप्रिय होते. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे होते. मात्र, 2017मध्ये त्यांचं निधन झालं. मात्र, पतीच्या निधनाने मोनिका राजळे खचून गेल्या नाहीत. त्यांनी सामाजिक कार्यात कोणताही खंड पडू दिला नाही.
कार्यसम्राट आमदार
शेगाव-पाथर्डीत विधानसभा मतदारसंघात त्यांनी अनेक विकासकामे केली. त्यांनी सहा वर्षात मतदारसंघातील रखडलेली कामेही मार्गी लावली. त्यामुळे त्यांना मतदारांनी कार्यसम्राट आमदार म्हणूनच पदवी बहाल केली आहे. केवळ राजकारणातच नव्हे तर सहकार क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीतील सत्ता त्यांनी आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे.
मंत्रिपद हुकलं
राजळे या दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्या मंत्री होतील अशी चर्चा होती. त्यांच्या समर्थकांनी भाजपकडे तशी मागणीही केली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपची सत्ता येऊ शकली नाही, त्यामुळे राजळे यांचं मंत्रिपद हुकलं. (know about bjp’s popular mla Monika Rajale)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 21 August 2021 https://t.co/bmjfHAFVC2 #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2021
संबंधित बातम्या:
अन् सासऱ्यांचीही कोंडी झाली… नेमकं काय घडलं?; वाचा राजकारणातले ‘संग्राम’ जगताप!
पान टपरीवाला ते आमदार; ‘आपला कामाचा माणूस’ अण्णा बनसोडेंबद्दल घ्या जाणून!
वडिलांच्या निधनानंतर पार्टी बदलली, टोकाचा निर्णय का घेतला?; वाचा निरंजन डावखरेंचं ‘राज’कारण!
(know about bjp’s popular mla Monika Rajale)