प्रस्थापितांना धक्का देणारा आणि राजकारणाची दिशा बदलणारा ‘अकोला पॅटर्न’ काय होता?; वाचा स्पेशल स्टोरी!
माजी मंत्री मखराम पवार यांचं नुकतंच निधन झालं आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या 'अकोला पॅटर्न'चे ते शिलेदार होते. मखराम पवार यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा अकोला पॅटर्नची चर्चा रंगू लागली आहे. (know about prakash ambedkar and his akola pattern)
मुंबई: माजी मंत्री मखराम पवार यांचं नुकतंच निधन झालं आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘अकोला पॅटर्न’चे ते शिलेदार होते. मखराम पवार यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा अकोला पॅटर्नची चर्चा रंगू लागली आहे. राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा काय होता हा अकोला पॅटर्न? त्याचं फलित काय? यावर टाकलेला हा प्रकाश. (know about prakash ambedkar and his akola pattern)
मखराम पवार यांनी 31 डिसेंबर 1989 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन फेब्रुवारी 1990 मध्ये भारिप (भारतीय रिपब्लिकन पक्ष) चे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्या निवडणुकीत आलेल्या राजकीय अनुभवातून पक्षाचे आमदार असलेले मखराम पवार यांनी अल्पसंख्याक, दलित व आदिवासी यांच्यासह बहुजन समाजातील सर्व जातींची एकसंघ राजकीय व सामाजिक शक्ती अकोला जिल्हयात उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तत्कालीन खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत याबाबत चर्चा करून अकोला जिल्हा बहूजन समाज महासंघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. भारिपचे पदाधिकारी लंकेश्वर गुरुजी, सूर्यभानजी ढोमणे, हरिदास भदे, प्राचार्य सुभाष पटनायक, बी आर सिरसाट, श्रीकृष्ण वानखडे आदी नेत्यांनी 23 ऑगस्ट 1990मध्ये बहूजन समाज महासंघाची स्थापना केली. त्यावेळी मखराम पवार अकोल्याच्या मूर्तिजापूर मतदार संघाचे भारिपचे आमदार होते, अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली.
मंडल आयोगासाठी मोर्चा
व्ही. पी. सिंगांच्या या मंडल अधिसूचनेमुळे ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले. त्यामुळे प्रस्थापित वर्गातील तरुणांनी त्याला विरोध करत आंदोलने केली. त्यामुळे या आंदोलनाचा प्रतिकार केला पाहिजे असा निर्णय अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाने घेतला व बहुजन समाजाला मंडल आयोग समजावून सांगण्यासाठी अकोला जिल्हाभर प्रचार दौरे काढण्याचे निश्चित करण्यात आले. मंडल आयोग. शिफारशीच्या समर्थनार्थ दिनांक 11 ऑक्टोबर 1990 रोजी अकोला येथे प्रचंड मोर्चा काढण्याचेही ठरविण्यात आले. मोर्चाच्या तारखेपर्यंत बहुजन समाज महासंघाने अकोला जिल्हाभर तीन जीप्सने बहुजन समाजातील नेते दौरे करत होते. त्यांनी मंडल आयोगाच्या समर्थनार्थ 250 जाहीर सभा घेतल्या व संपूर्ण अकोला जिल्हा पिंजून काढला. भारिप व बहूजन समाज संघाने मंडल आयोग लागू करण्यासाठी ऐतिहासिक मोर्चा काढला होता.
अकोला पॅटर्नचा उदय
1992च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाचे 60 पैकी जवळ-जवळ 15 उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. 20 जिल्हा परिषदेचे उमेदवार केवळ 100 ते 200 मतांच्या फरकाने पराभूत झाले. बहुजन समाज महासंघाचा एवढा जबरदस्त रेटा होता की भाजप व शिवसेनेचे अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधे सर्व उमेदवार पराभूत झाले, त्यापैकी अनेकांच्या अनामत रक्क्मा जप्त झाल्या. बहुजन समाज महासंघाने दोन माजी आमदारांना चारी मुंड्या चीत केले. या प्रयोगाने अनेक प्रस्थापितांचे धाबे दणाणले.
अकोला जिल्ह्याच्या 13 पंचायत समितींच्या निवडणुकीमधे 120 उमेदवारांपैकी भारतीय रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज महासंघाचे 30 उमेदवार निवडून आले. आणि जवळ-जवळ 48 उमेदवार अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले. अकोला जिल्ह्याच्या अकोला व बार्शी टाकळी या दोन्ही अत्यंत प्रतिष्ठेच्या पंचायत समित्या भारिप व बहुजन समाज महासंघाने धनदांडग्या सत्तेच्या मक्तेदाराकडून हिसकावून घेतल्या. बार्शी टाकळी पंचायत समितीमध्ये बी. आर. शिरसाट हे सभापती झाले. तर अकोला पंचायत समितीत धनगर समाजातील हरिदास भदे हे सभापती झाले. हाच पॅटर्न पुढे अकोला पॅटर्न म्हणून नावारूपाला आणला गेला. बहुजन समाजातील 272 जाती आणि अल्पसंख्यांक जाती यांची भक्कम एकजूट करून विविध उपेक्षित समाजघटकांना सत्तेच्या मुख्यप्रवाहात आणणे हे अकोला पॅटर्नचे ध्येय होतं. अकोला जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वीही झाला. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रयोगाकडे लागलं होतं.
एक हजार विचारवंतांचा मेळावा
त्यानंतर 15 फेब्रुवारी 1993मध्ये मुंबईच्या केसी कॉलेजमध्ये एक हजार विचारवंतांचा ‘राज्यस्तरीय बहुजन समाज मेळावा’ घेण्यात आला. या मेळाव्याला विविध समाज घटकातील विचारवंतांना बोलावण्यात आलं. मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळ-जवळ सातशे प्रतिनिधी आले होते. ज्येष्ठ नेते डॉ. ए. टी. भोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आला. तत्कालीन खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तर अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार मखराम पवार हे या राज्यस्तरीय बहुजन समाज मेळाव्याचे निमंत्रक होते. तर मेळाव्याला आमदार विजय मोरे, नवनाथ आव्हाड, शांताराम पंदेरे व इतर अनेक नेते मंडळी उपस्थित होती.
बहुजन महासंघाचे शेगाव अधिवेशन
त्यानंतर बहुजन महासंघाने बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राज्यस्तरीय खुले अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे उद्घाटक प्रकाश आंबेडकर होते. तर अभिनेते निळू फुले, रामनगर, आणि प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर हे या मेळाव्याचे मुख्य निमंत्रित होते. ही 1993ची गोष्ट. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक 20 मार्च 1993 रोजी गजानन महाराज संस्थान मंगल कार्यालय, शेगाव येथे सकाळी 9 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजेपर्यंत विविध विषयांवर बहुजन समाजातील विचारवंतांची 4 चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. सदर अधिवेशन हे बहूजन महासंघाचे होते त्याठिकाणी कुठेही भारिप बहूजन महासंघ विलीनीकरण झाले नाही, असं राजेंद्र पातोडे यांनी सांगितलं.
भारिप-बहुजन महासंघाची स्थापना
पुढे 1995च्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या एक वर्षी आधी खुलताबाद येथील बैठकीत भारिप-बहूजन महासंघ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी नोंदणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भीमराव केराम हे किनवटमधून भारिप-बहुजन महासंघाचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. आणि किनवट मधून भीमराव केराम हे भारिप बहूजन महासंघाचे पहिले आमदार निवडून आले. 1995 मध्ये टर्म संपलेल्या मखराम पवारांना पक्षाने पुन्हा विधान परिषदेत पाठवले आणि राज्याच्या सत्तेत सहभागी असल्याने मखरराम पवार हे कॅबिनेट मंत्री झाले. सोबतच डॉ. दशरथ भांडे हे देखील कॅबिनेट मंत्री होते, असंही पातोडे यांनी स्पष्ट केलं. (know about prakash ambedkar and his akola pattern)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 10 August 2021https://t.co/jE9FwqCuvt#sanjayraut | #BJP | #shivsena
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
संबंधित बातम्या:
प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’चे शिलेदार मखराम पवार यांचे निधन
Raj Thackeray new Look : राज ठाकरेंचा आणखी एक नवा लूक समोर
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत; चंद्रकांत पाटील म्हणाले…
(know about prakash ambedkar and his akola pattern)