Eknath Shinde : शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये कुणाला किती मंत्रिपदे? ‘या’ अपक्ष आमदारांनाही लागणार लॉटरी?
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सरकारच्या विस्तारावर भाष्य केलं. आम्ही राजकीय घडामोडीमुळे आमच्या मतदारसंघात आलो नव्हतो.
मुंबई: राज्यात एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. येत्या 11 जुलै रोजी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल येणार आहे. त्यानंतरच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नव्या सरकारमध्ये आपल्याला संधी मिळावी म्हणून अपक्ष आणि इतरांनी सेटिंग करण्यास सुरुवात केली आहे. अपक्ष आमदारही (MLAs) नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं म्हणून उत्सुक आहेत. शिंदे यांच्यासोबत आलेल्या सर्वच बंडखोर मंत्र्यांना खातं बदलून हवं आहे. काहींना कॅबिनेटची आस लागली आहे तर काहींना मंत्रिपद नाही तर किमान महामंडळ मिळावं असं वाटत आहे. तर माजी आमदारही संधी मिळतेय का याची चाचपणी करत आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सरकारच्या विस्तारावर भाष्य केलं. आम्ही राजकीय घडामोडीमुळे आमच्या मतदारसंघात आलो नव्हतो. आता शपथ घेतल्यावर मतदारसंघात आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ठाण्याला गेले नव्हते. तर मीही नागपुरात आलो नव्हतो. त्यामुळे आता मतदारसंघात आलो आहोत. मुंबईत गेल्यावर आम्ही एकत्रं बसू आणि निर्णय घेऊ. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आणि इतर गोष्टी सर्व ठरल्यावर तुम्हाला सांगू, असं फडणवीस यांनी कालच सांगितलं होतं.
फॉर्म्युला काय असेल?
शिंदे गट आणि भाजपचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. शिंदे गटाला एकूण 14 मंत्रिपदे देण्यता येणार आहेत. त्यात सहा कॅबिनेट मंत्रीपदे आहेत. तर भाजपला 27 ते 29 मंत्रिपदे मिळणार आहेत. शिंदे गटाकडून सर्व बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाणार आहे. मात्र, त्यातील राज्यमंत्र्यांना बढती मिळतेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासकरून अब्दुल सत्तार आणि बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळतेय का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच संजय राठोड यांच्याकडे वन खातं येणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
बच्चू कडू, जैस्वाल यांच्या नावाची चर्चा
शिंदे मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं निश्चित आहे. पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार की राज्यमंत्रीपद हे गुलदस्त्यात आहे. बच्चू कडू यांनी आधीच सामाजिक न्याय खातं देणार असाल तर सोबत अपंगांसाठीचं नवं खातं तयार करून तेही द्यावं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. तर संजय शिरसाट हे सुद्धा सामाजिक न्याय विभागासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय नेमकं कुणाला मिळणार? या दोघांपैकी एकाला मिळणार की तिसऱ्या व्यक्तीला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार आशिष जैस्वाल यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. जैस्वाल हे नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूरकर जैस्वाल यांच्यावर फडणवीस मेहरबान होतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.