मुंबई: दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मध्यरात्री 3 वाजता राज्यसभा निवडणुकीचा (Rajya Sabha Election निकाल लागला. अपेक्षप्रमाणे महाविकास आघाडीचे तीन आणि आणि भाजपचे दोन खासदार निवडून आले. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची चुरस होती. त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) निवडून येणार की भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले. पवार यांना केवळ 33 मते पडली. तर संख्याबळ नसतानाही महाडिक यांना 41 मते पडली. त्यामुळे महाडिक विजयी झाले. या निवडणुकीत तब्बल महाविकास आघाडीची तब्बल 10 मते फुटली. विशेष म्हणजे 17 अपक्ष आमदारसोबत असूनही महाविकास आघाडीचे 10 आमदार फुटले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कोणत्या अपक्षांनी 10 मते भाजपला दिल? नेमकी आकडेवारी काय आहे? याचाच घेतलेला आढावा.
महाविकास आघाडीकडे 172 आमदारांचं पुरेसं संख्याबळ होतं. शिवसेनेकडे 55, राष्ट्रवादीकडे 51 आणि काँग्रेसकडे 44 मते होती. म्हणजे आघाडीकडे एकूण 150 मते होती. सोबत अपक्षांची 17 मते मिळून 167 मते आघाडीकडे होती. या शिवाय एमआयएमची 2 आणि बविआकडे 3 मते होती. ही सगळी गोळाबेरीज 172 मतांची होती. आघाडीचे चार उमेदवार रिंगणात उभे होते. 172 मतांची समसमान वाटणी केल्यास प्रत्येक उमेदवाराला 43 मते मिळतील अशी परिस्थिती होती. मात्र, प्रत्यक्षात उलटे झाले.
आघाडीकडे 172 मते होती. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी 43 मते जाणे अपेक्षित होते. मात्र, निकालात प्रत्यक्ष भलताच आकडा समोर आला आहे. प्रत्येकाला 43 मते मिळणं अपेक्षित असताना काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना 44 मते मिळाली. म्हणजे प्रतापगढी यांना एक मत अतिरिक्त मिळालं. तर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना बरोबर 43 मते मिळाली. राऊत यांना 42 मते मिळाली. त्यांचं एक मत बाद झालं. शिवसेनेच्याच उमेदवाराचं मत बाद झाल्याने राऊतांना फटका बसला. पण संजय पवार यांना 33 मते पडली आहेत. त्यांना तब्बल दहा मतांचा फटका बसला.
आघाडीकडे 17 अपक्ष आणि एमआयएमची दोन मते होती. तसेच बविआची तीन मतेही आघाडीलाच मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. म्हणजे अपक्ष आणि इतरांची मिळून आघाडीकडे 22 अतिरिक्त मतांचा कोटा होता. पण तरीही आघाडीची 10 मते फुटली. यात एमआयएमने आघाडीला मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे त्यांची मते फुटण्याची शक्यताच कमी असल्याचं सांगितलं जातं. बविआने शेवटपर्यंत कुणाला मतदान केलं हे सांगितलं नाही. त्यामुळे बविआची तीन आणि अपक्षांची सात मते फुटली का? असा सवालही केला जात आहे. या शिवाय प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हेही आघाडीवर नाराज होते. त्यांनी मतदान केलं. पण कुणाला केलं हे शेवटपर्यंत सांगितलं नाही. मात्र, आघाडीच विजयी होईल असं त्यांनी मतदानानंतर सांगितलं होतं. त्यामुळे बच्चू कडूंनी आघाडीलाच मतदान केल्याचं सांगितलं जात आहे.