भंगारचा व्यवसाय असलेले मलिक किती कोटींचे ‘नवाब’? जाणून घ्या मलिकांची एकूण संपत्ती
Nawab Malik Net worth : महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्यांच्या घरावर पहाटे पहाटे धडक दिल्यानं बुधवारी सकाळपासून ईडीचे अधिकारी चर्चेत होते. अखेर सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब (Nawab Malik) मलिकांच्या घरावर पहाटे-पहाटे धडक दिल्यानं आज (बुधवार, 23 फेब्रुवारी) सकाळपासून ईडीचे अधिकारी चर्चेत होते. अखेर सात तासांच्या (7 Hours inquiry) चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता नवाब मलिक यांच्यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशाताच आता आणखी एक कुजबूज ऐकायला मिळतेय, ती म्हणजे नेमकी नवाब मलिक यांची संपत्ती आहे तरी किती? दरम्यान, याबाबत 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार नवाब मलिक यांची संपत्ती (Nawab Malik Net worth) नेमकी किती होती, याबाबतही अधिक स्पष्टता येऊ शकेल. नॅशनल इलेक्शन वॉच या संकेतस्थळावर नवाब मलिकांनी आपल्या 2019च्या प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांच्याना भंगारवाला असल्याची टीकाही काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबाचा भंगार व्यवसाय होता, असं नवाब मलिक यांनीही मान्य केलं होतं. याच नवाब मलिक यांच्या कुटुंबाचे छोटे-मोठे व्यवसाय होते. त्याचं कुटुंबाचं एक हॉटेलही होतं. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले, पण कर्मभूमीनं मुंबईकर असलेल्या नवाब मलिकांची संपत्ती ही कोटींच्या घरात आहे. नवाब मलिक यांच्याकडे पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असून त्यांच्यावर एकूण 45 लाख रुपयांपर्यंत कर्ज होतं, अशी माहिती 2019च्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली होती.
2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार नवा मलिक यांची संपत्ती खालीलप्रमाणे :
- नवाब मलिक यांची एकूण संपत्ती (चल आणि अचल संपत्ती) 5 कोटी 74 लाख 69 हजार 772 रुपये इतकी आहे.
- मलिकांवर एकूण कर्ज 45 लाख 30 हजार 437 रुपये असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं.
- नवाब मलिकांनी आपल्याकडे 5 लाख 51 हजार 867 रुपयांची रोकड असल्याचं म्हटलं होतं.
- तर बँकेत 6 लाख 69 हजार 214 रुपये असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली होती.
- इतर बॉन्ड, शेअर्स अशी मिळून एकूण 1 कोटी 13 लाख 37 हजार 412 इतकी रक्कम नवाब मलिक यांच्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
- तर एलआयसीत 5 लाख रुपये असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.
- नवाब मलिकांनी कर्ज दिलेली रक्कम ही 16 लाख 41 हजार 233 असल्याचं सांगितलं होतं.
- नवाब मलिक यांच्यातडे एकूण दोन कार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अर्टिगा आणि स्कोडा अशा दोन गाड्याच्या त्यांच्याकडे असून यांची किंमत 10 लाख 98 हजार 99 रुपये असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिली होती.
- नवाब मलिकांकडे असलेल्या एकूण दागिन्यांची किंमत 32 लाख 43 हजार 605 रुपये असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
- तर एकूण चल संपत्ती ही 1 कोटी 90 लाख 68 हजार 431 रुपये इतका असल्याचं नवाब मलिकांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं असल्याचा दावा नॅशनल इलेक्शन वॉच या संकेतस्थळानं प्रकाशित केलेल्या माहितीत दिसून आला आहे.
संबंधित बातम्या :
Exclusive | मलिकांची अरेस्ट ऑर्डर टीव्ही 9 मराठीच्या हाती! मनी लॉड्रिंग ऍक्ट 2002च्या अंतर्गत कारवाई